गरिबांच्या फ्रीजला वाढती मागणी, परवडणाऱ्या दरात उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 01:15 AM2019-05-29T01:15:37+5:302019-05-29T01:15:49+5:30
यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मे महिन्यात तर तापमानाने उच्चांक गाठला.
किन्हवली : यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मे महिन्यात तर तापमानाने उच्चांक गाठला. त्यामुळेच यंदा गरिबांचा फ्रीज अशी ओळख असणाºया माठांना बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. शहरी भागात प्रामुख्याने एसी, कूलर, पंखे यांची मागणी वाढते. तर, ग्रामीण भागात मातीच्या मडक्यांच्या मागणीत वाढ होते. माठ, रांजण यातील पाणी थंड राहते. या माठातील थंडावा हा नैसर्गिक असतो, त्यामुळे देखील अनेकदा फ्रीजपेक्षा माठातील पाण्याला प्राधान्य दिले जाते. शिवाय, पाण्याची चवही खूपच छान असते. शिवाय, किंमतही कमी. त्यामुळे शहरी भागातही आता माठांची मागणी वाढताना दिसते.
>पारंपरिक धंदा सोडून दुसरा व्यवसाय निवडल्याची व्यावसायिकांची खंत
गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. हे माठ, रांजण तसेच इतर मातीच्या वस्तू बनवण्यासाठी लागणारी माती आता फार प्रमाणात मिळत नाही. तसेच हा व्यवसाय करण्यासाठी कुटुंबातील सर्व माणसांची मदत लागते. मात्र, आता प्रामुख्याने विभक्त कुटुंबपद्धती असल्याने माती आणणे, माठ घडवून भट्टी तयार करणे तसेच पक्के माठ बाजारात विकायला घेऊन जाणे, यासाठी माणसे लागतात. तेवढे मनुष्यबळ आज नाही. शिवाय, आजची युवा पिढी हा पिढीजात धंदा करत नाही. तर, बाहेरील मजूर माणसे परवडत नाहीत. हा माठ बाजारात ५० ते ६० रुपये, तर रांजण १००-१५० रुपये किमतीने विकले जातात. या रकमेतून घरखर्च कसाबसा भागतो. परिणामी, अनेक कुटुंबीयांनी हा पारंपरिक धंदा सोडून दुसरा व्यवसाय निवडला आहे. या व्यवसायाला उतरती कळा लागून तो बंद पडण्याच्या वाटेवर आहे, अशी खंत तालुक्यातील कुंभारवाड्यातील सोनावळे या कुंभाराने व्यक्त केली.