वसईच्या पोलिसांना कर्जवसुलीसाठी अश्लील शिवीगाळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2023 06:29 PM2023-12-09T18:29:14+5:302023-12-09T18:30:18+5:30

पोलिसाची नोकरी घालवून संपवून टाकण्याची धमकी; कर्जवसुली शाखेतील महिलांवर खंडणीचा गुन्हा दाखल.

indecent abuse to vasai police for debt recovery | वसईच्या पोलिसांना कर्जवसुलीसाठी अश्लील शिवीगाळ 

वसईच्या पोलिसांना कर्जवसुलीसाठी अश्लील शिवीगाळ 

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- ऍक्सिस बँकेच्या कर्जवसुली शाखेतील महिलांनी कर्जवसुलीसाठी वसईच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत नोकरी घालवून टाकण्याची व संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. वसईतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी शुक्रवारी तक्रार करत ऍक्सिस बँकेच्या ८ मोबाईल क्रमांकांवरून फोन करणार्‍या महिलां विरोधात वसई पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. 

वसई पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्‍याने ऍक्सिस बँकेकडून साडेसहा लाखांचे खासगी कर्ज घेतले होते. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे त्याला तीन हप्ते भरता आले नव्हते. त्याची रक्कम ४५ हजार एवढी थकली होती. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी या पोलीसाला तसेच त्याच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना १ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान धमक्यांचे फोन केले आहेत. तसेच वसई पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तुमच्या सहकार्‍याने आमचे ३ हप्ते थकवले आहे. ते पैसे तुम्ही भरा किंवा त्याला हजर करा असे सांगण्यात आले.  कर्ज वसुली करणारे एजंट सर्व पोलीस अधिकार्‍यांना वेगवेगळ्या क्रमांकाने फोन करून धमकावत होते. तुम्ही पोलीस असला तरी नोकरी घालवू, रस्त्यावर आणून बरबाद करू, कायमस्वरुपी संपविण्याची धमकी देत अश्लील शिवीगाळ करत होते.

कर्जवसुली करणार्‍या या एजंटांची दादागिरी प्रचंड आहे. ते जर काहीही संबंध नसताना पोलिसांना अशा धमक्या देत असतील तर सर्वसामान्यांचे काय होत असेल? बँकेने या एजंटला नेमले असल्याने बँक देखील जबाबदार आहे. चौकशीमध्ये सर्वांवर कारवाई केली जाईल. म्हणून त्या महिलांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली आहे.

Web Title: indecent abuse to vasai police for debt recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.