भारतात महिलांची उपेक्षा, पोलीस महानिरीक्षकांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:31 AM2017-10-07T00:31:20+5:302017-10-07T00:32:02+5:30
आपल्या देशात महिलांना सांस्कृतिकदृष्टया पूजले जात असले तरी सामाजिक दृष्ट्या व्यावहारीकपणे मात्र तिची आजही उपेक्षा होत आहे.
वसई : आपल्या देशात महिलांना सांस्कृतिकदृष्टया पूजले जात असले तरी सामाजिक दृष्ट्या व्यावहारीकपणे मात्र तिची आजही उपेक्षा होत आहे. महिला सक्षमीकरण आणि समानतेच्या बाबतीत जे राष्ट्र पुढे आहेत, तेथील विकास मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते, असे मत कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांनी वसईत बोलताना केले.
पालघर जिल्हा पोलिसांनी जाणिव ट्र्स्टच्या मदतीने जिल्ह्यात मुली वाचवा आणि त्यांची सुरक्षा करा (सेव द गर्ल्स अँड प्रोटेक्ट गर्ल्स) हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याविषयावर जनजागृती करण्यासाठी जाणिव एक एहसास हा लघु चित्रपटही तयार करण्यात आला आहे. त्याचे विमोचन बजाज यांच्या हस्ते वसईत करण्यात आले. पालघरचे पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, वसईचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन, जाणिव ट्रस्टचे मिलिंद पोंक्षे आणि आरती वाढेर यावेळी उपस्थित होते. जाणिवच्या मदतीने मुलींच्या संवर्धन ग्रामीण भागातील तळागाळापर्यंतच्या घटकांपर्यंत पोचवणार आहोत, अशी माहिती पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी दिलीे. मुलींच्या शोषणाविरोधात यापुढे व्यापक प्रचार व प्रसाराची मोहिम हाती घेतली जाईल, असे अतिरिक्त पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी आपल्या भाषणात सांगितले. जाणिवने विविध शाळा आणि कॉलेजांमध्ये अडीचशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत. येत्या २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत ५०१ व्याख्यानांचे उद्दीष्ट ठेवले आहे, अशी माहिती जाणिवचे मिलिंद पोंक्षे यांनी दिली.