भारतातील लोकशाही, माध्यमे, न्यायालये संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 02:42 AM2018-05-22T02:42:27+5:302018-05-22T02:42:27+5:30
आपल्याच तालावर नाचविण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न : परिसंवादात भालचंद्र मुणगेकरांसह मान्यवरांचा घणाघाती आरोप
पालघर : देशातील प्रसार माध्यमे, न्यायालय आदी सर्व संस्थानी आपल्या इशाऱ्यावर नाचायला हवे असा भाजपाचा प्रयत्न सुरू असून त्यामुळे देशातील लोकशाही संकटात सापडली असल्याची टीका काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश विधी व मानव अधिकार विभाग यांच्या वतीने बुद्धिजीवींच्या दृष्टिकोनातून सद्यस्थितीतील भारतात काँग्रेसची भूमिका ह्या विषयावर शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे, माजी खासदार व उमेदवार दामू शिंगडा,अॅड. पोंदा,सुधीर जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
एका बाजूने पंतप्रधान मोदींनी विकासाची भाषा करायची आणि दुसºया बाजूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित संस्थानी जातीयवादी भूमिका घ्यायची अशी भाजपची रणनीती गेल्या चार वर्षांत अनुभवास येत असल्याचे मुणगेकरांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी पुढे बोलताना मुणगेकर यांनी मोदी विकासाची भाषा बोलत शहरी वर्ग, व्यापारी व बुद्धिजीवी वर्गाला आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही प्रारूप आराखडेच नसल्याचेही अलीकडील काही वर्षात दिसून आले असून नोटबंदी, गुजरात विकास मॉडेल आदी बाबीमुळे त्यांचा फसवा चेहरा जनतेसमोर उघडा पडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मोदी १८-१८ तास काम करतात असे सांगून देशाच्या विकासासाठी त्यांची वाहवा केली जाते परंतु १८ तास काम करण्यासाठी ते देशात असतातच कुठे असा सवालही उत्तम खोब्रागडे ह्यांनी उपस्थित केला. काँग्रेस ने वाडा, मनोर, विक्रमगड भागात औद्योगिक वसाहती निर्माण करून लोकांसाठी रोजगाराची निर्मिती केल्याचा दावा केला.