कोळंबीला झाली ‘व्हाइट स्पॉट’ची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:36 AM2019-09-27T00:36:45+5:302019-09-27T00:36:50+5:30
संसर्गामुळे कोळंबीचा दर्जा घसरला; कोळंबी उत्पादक हवालदिल
डहाणू : एकीकडे सागरी मासेमारी व्यवसायात उत्पन्न कमी झाल्याने मासेमारी व्यवसाय तोट्यात गेला असताना त्याला पर्यायी आणि उपयुक्त व्यवसाय असलेल्या कोळंबी संवर्धन व्यवसायाला व्हाईट स्पॉट रोगाचा डाग लागला आहे. यामुळे कोळंबी उत्पादक हवालदील झाले आहेत. पालघर जिल्ह्यात एकूण १२० कोळंबी प्रकल्प असून त्यापैकी डहाणू तालुक्यात तब्बल ३१ कोलंबी प्रकल्प आहेत.
पर्यावरणामुळे कवचधारी प्राण्यांना व्हाईट स्पॉटचा संसर्ग झाला असून त्याचा फटका कोळंबी उत्पादकांना बसला आहे. कोळंबीला पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसू लागल्याने कोळंबीचा दर्जा घसरुन निर्यातीवर त्याचा परिणाम दिसला आहे. व्हाईट स्पॉटमुळे मांस आणि कवच यामध्ये ठिसूळपणा जाणवतो. तसेच कोळंबीची वाढ ज्या वेगाने व्हायला पाहिजे त्या वेगाने ती न होता वाढ खुंटते. यामुळे नुकसानीला तोंड द्यावे लागते.
सागरी मासेमारीला पर्यायी आणि उपयुक्त व्यवसाय म्हणून महाराष्ट्र शासनाने काही वर्षापूर्वी मच्छीमारांसाठी डहाणू गाव, वडकुन, चिखले, सरावली, सावटा तसेच परिसरातील काही मच्छीमारांना कोळंबी संवर्धकांनी खाजण जागा भाडेपट्ट्याने दिल्या होत्या. तालुक्यातील अनेक मच्छिमारांनी पूरक आणि पर्यायी व्यवसाय म्हणून शासनाच्या खाजण जागेत कर्जाच्या सहाय्याने कोळंबी प्रकल्प विकसित केले आहेत. या व्यवसायात नफ्यापेक्षा आवश्यक लागणारे खाद्य, वीज, प्रोफाइल आदींच्या किंमतीत दिवसेंदिवस होणारी वाढ यामुळे उत्पादक हवालदिल झाला आहे.
कोळंबीवरील व्हाईट स्पॉटची लागण होऊ नये यासाठी पाणी आणि कोळंबीची चाचणी करण्यासाठी पालघर जिल्ह्यात प्रयोगशाळा अस्तित्वात नाही. जिल्ह्यात प्रयोगशाळा मंजूर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोळंबीवरील रोगामुळे नुकसान टाळता येईल.
-शशिकांत बारी, कोळंबी उत्पादक
व्हाईट स्पॉट हा आजार कवचधारी प्राण्यांमध्ये दिसून येतो. व्हाईट स्पॉटमुळे मांस आणि कवच यामध्ये ठिसूळपणा जाणवतो. पाण्यातून किंवा अन्य बाह्य परिणामांमुळे हा संसर्ग पसरतो. त्याची वेळोवेळी दक्षता घेत गेल्यास नुकसान टाळता येते.
-पूजा साळवी, एएफडीओ,
फिशरीज विभाग