धाकटी डहाणूत रेशनिंगवर निकृष्ट तांदूळ; ग्राहकांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 02:59 AM2021-03-24T02:59:07+5:302021-03-24T02:59:19+5:30
नवीन धान्य देण्याची पुरवठा विभागाची सूचना
बोर्डी : धाकटी डहाणू येथे उन्नती स्वयंसहायता महिला बचतगटामार्फत रास्तभाव धान्य दुकान चालवले जाते. मंगळवारी येथे लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या तांदळाचे वाटप सुरू होते. याबाबत लाभार्थ्यांनी हे धान्य घेण्यास नकार दिल्याने वाटप थांबविण्यात आले. दरम्यान, निकृष्ट धान्य लाभार्थ्यांकडून परत घेण्यासह त्यांना नवीन धान्य देण्याच्या सूचना रास्त भाव दुकानदारांना दिल्याची माहिती डहाणू पुरवठा अधिकारी विनोद वागदे यांनी दिली.
डहाणूतील धाकटी डहाणू येथील रास्तभाव धान्य दुकानात मंगळवारी सकाळी लाभार्थ्यांना धान्याचे वाटप सुरू असताना काही ग्राहकांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ मिळाला. ही कुजबुज सुरू असताना खराब तांदूळ मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या वाढून त्यापैकी काहींनी हे धान्य घेण्यास नकार दिला. त्यानंतर डहाणू पुरवठा अधिकाऱ्यांना तक्रार करीत निकृष्ट तांदळाचे फोटो पाठवले. त्यानंतर पुरवठा अधिकारी विनोद वागदे यांनी वितरण थांबविण्यासह तत्काळ चांगले धान्य देण्याच्या सूचना रास्त धान्य दुकानदाराला दिल्या आहेत. या दुकानात प्राधान्य कुटुंब लाभार्थी ५८७, तर अंत्योदय लाभार्थी १३७ असे एकूण ७२४ लाभार्थी आहेत. दरम्यान, राज्यात ऑनलाइन धान्य वितरणप्रणाली विकसित होत आहे. या प्रणालीमध्ये स्वस्त धान्य वितरण व्यवस्था पॉस मशीनच्या माध्यमातून होत आहे. लाभार्थ्याला त्याच्या वाट्याचा लाभ मिळाल्यानंतर त्याची ऑनलाइन नोंदणी होते. या वितरण व्यवस्थेत हे आमूलाग्र बदल होत असताना निकृष्ट दर्जाचे धान्य लाभार्थ्यांच्या माथी मारले जात आहे. त्यापासून मुक्तता मिळणार कधी, असा प्रश्न विचारला जात आहे.
निकृष्ट दर्जाचे धान्य असल्याची तक्रार प्राप्त झाली असून वाटप थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नवे धान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. - विनोद वागदे, पुरवठा अधिकारी, डहाणू
सुमारे ५०० किलो तांदूळ खराब असल्याचे ग्राहकांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर वाटपाचे काम तत्काळ थांबविण्यात आले. त्याची माहिती पुरवठा विभागाला देण्यात आली आहे. - अंजली माच्छी, अध्यक्ष, उन्नती स्वयंसहायता महिला बचतगट