देवी मूर्तींनाही महागाईची झळ, सामग्रीच्या महागाईचा परिणाम, मूर्तीच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 05:34 AM2017-09-14T05:34:15+5:302017-09-14T05:34:28+5:30
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात येउन पोहचली आहे़ देवीच्या विविध प्रकारच्या मूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत़ मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीही कच्चा मालाच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याने ग्राहकांना मूर्ती घेण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे.
विक्रमगड : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात येउन पोहचली आहे़ देवीच्या विविध प्रकारच्या मूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत़ मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीही कच्चा मालाच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याने ग्राहकांना मूर्ती घेण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे़
विक्रमगड व परिसरात नवरात्र उत्सव मोठया भक्तीमय वातारणात व धुमधडाक्यात साजरा केला जातो़. विविध मंंडळे आणि घरामध्ये देवीच्या मुर्तीची स्थापना केली जाते़ मात्र यावर्षी देवीच्या मूर्ती बनविण्यासाठी लागणारी सामग्री महागल्याने मुर्तींच्या किंमती २० ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ग्राहकांना मागील वर्षी दीड फुटांची मुर्ती १५०० ते २००० रुपयांना मिळत होती़ ती आता २००० ते ३००० रुपयांच्या घरात जाणार आहे़ देवीच्या मूर्तीचे साचे बनविण्यासाठी लागणारी शाडूची माती गुजरातहून आणली जाते़ त्यामुळे मूर्तिकारांना एका गोणीला ३०० ते ४०० रुपये मोजावे लागतात़तसेच पर्यावरणाचे प्रदूषण होऊ नये व या मूर्ती पाण्यात लवकर विरघळण्यासाठी जिप्समचा प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती बनविण्यासाठी उपयोग केला जातो़ त्याच्या १ गोणीची किंमत ३०० ते ४०० रुपये आहे़ तसेच काबोलच्या एका बंडलची किंमत १००० ते १२०० रुपयांपर्यत पोहचली आहे़ त्याचबरोबर ग्राहकांची नैसर्गीक रंगाला अधिक मागणी आहे़ त्यामुळे मूर्तीना नैसर्गिक रंगच द्यावा लागतो़ मात्र त्याची किंमत ही इतर रंगापेक्षा अधिक असून स्किन कलरला जास्त मागणी असून त्यासाठीही ज्यादा किंमत मोजावी लागते़ विक्रमगड येथील एकनाथ व्यापारी व बंधू यांच्या चित्रशाळेमध्ये आॅर्डरप्रमाणे देवीच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत़ गणेश मुर्तीबरोबरच देवीच्या मुर्ती साकारण्याचे काम ही मागील चार पाच महिन्यापासून सुरु असून आता ते आता अंतीम टप्प्यात आले आहे़ पावसाने उघडीप दिल्यामुळे मूर्त्या आणि रंगकाम झटपट वाळले याबद्दलही मूर्तीकार समाधानी आहेत.
वेल्वेट, डायमंडच्या साडीच्या मूर्तींना पसंती
नवरात्रीमध्ये देवीच्या मुर्तीचे अलंकार आणि सजावटीला अधिक महत्व असते़ त्यानुसार कारागीर मूर्तींची रंगरंगोटी करत असतात. मात्र मागील वर्षापासून जरी, चमकी आणि वेल्वेटच्या रंगापासून तयार करण्यात आलेली साडी नेसलेल्या या देवीच्या मूर्तीला ग्राहकांची मोठी मागणी आहे़
यामध्ये लाल, हिरवा, गुलाबी, पांढरा,भगवा आदी रंगाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो़ या रंगामुळे मूर्ती चमकत असून रात्रीच्या वेळी अधिक आकर्षक वाटते़ अशा प्रकारच्या मूर्तीची साडी तयार करण्यास कारागींराना जास्त वेळ लागतो. मात्र ग्राहकांची पसंती त्याला मोठया प्रमाणात असल्यामुळे अशाच मूर्ती साकारण्याकडे कलाकारांचा कल आहे. कारण त्यांना किंमतही चांगली मिळते.
सप्तश्रृंगी, एकवीरा, तुळजाभवानी, वाघावर स्वार, झालेली अंबामाता, सिंहाच्यापुढे उभी असलेली भारतमाता आदी प्रकारच्या मूर्तींना मोठया प्रमाणात मागणी आहे़ याशिवाय कोल्हापूरची अंबामाता व अन्य रुपातील देवींच्या मूर्तींनाही त्या-त्या भाविकांकडून मागणी आहे.
गणेशाची मूर्ती बनविण्यापेक्षा देवीच्या मूर्ती तयार करण्यास वेळ अधिक लागत असून त्यासाठी लागणाºया सामुग्रीच्या किंमतीमध्ये २० त २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मूर्ती बनवितांना त्यांची रचना रंगरंगोटी अधिक महत्वाची असते़ तसेच मूर्ती बनवितांना त्यांच्यामध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला जातो़
-एकनाथ लक्ष्मण व्यापारी, मूर्तीकार, चित्रशाळा विक्रमगड