वसईत भाज्यांना महागाईची फोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:13 PM2019-11-04T23:13:40+5:302019-11-04T23:13:48+5:30
मालाची आवक घटली : गृहिणींचे स्वयंपाकाचे बजेट बिघडले; शोधला कडधान्याचा पर्याय
पारोळ : महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. बाजारपेठेत मालाची आवक कमी झाल्याने वसई, विरार, नालासोपारा भागात भाजीपाला महागला असल्याने सामान्य नागरिकांचे स्वयंपाक घराचे बजेट बिघडले असून या पावसामुळे आता भाज्यांनाही महागाईची फोडणी बसत आहे. तर भाज्या महाग झाल्याने आता नागरिकांनी कडधान्याचा पर्याय शोधला आहे.
येत्या दोन दिवसात वेधशाळेने महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज दिल्याने भाजीपाल्याची आवक कमी होणार असल्याने काही दिवस भाज्यांचे भाव तेजीत राहणार आहेत. चंदनसार, होळी या भाजी बाजारात नाशिकवरून रोज भाजीपाला येतो तर वसई पूर्व तसेच पश्चिम भागातील शेतकरीही येथे विक्रीसाठी भाज्या आणतात. व्यापारी या शेतकऱ्यांकडून होलसेल दराने भाजीपाला विकत घेतात आणि शहरी तसेच ग्रामीण भागात किरकोळ दराने विकतात. पण या काही दिवसात परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले तसेच माल शेतात राहिल्याने त्याची नासाडीही झाली. यामुळे येणाºया मालाची आवक घटली तर बाजारात मालाची उपलब्धता कमी प्रमाणात असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले.
टोमॅटोने किलोला सत्तरी गाठली. वांगीही ६० वर पोहोचली. भेंडीही ८० वर गेली. मिरची ६० रुपये किलो झाल्याने तीही आणखी तिखट झाली. तर जेवणाची लज्जत वाढवणारी कोथिंबीर ही ६० रुपये जुडी झाली. कांदे ८० रुपये किलो झाले आहेत. मेथी, पालक, शेपू पालेभाज्यांच्याही दरात दुप्पट वाढ झाली तर काकडी, गाजर, बीट यांचाही किलो मागे ६० रु. असा भाव वधारला.
ग्राहक करतात होलसेल खरेदी
च्किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर वाढत असल्याने ग्राहक चंदनसार बाजारात होलसेल दराने भाजी विकत घेत असून एकत्रित पाच ते दहा किलो घेतलेली भाजी आपआपसात वाटप करत असल्याचे चित्र भाजी बाजाराच्या परिसरात पाहायला मिळत आहे. तर वाढीव दराने माल विकत घ्यावा लागत असल्याने किरकोळ बाजारात दरात होत असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.