होळीच्या तोंडावर पुरणपोळ्यांनाही महागाईची झळ
By admin | Published: March 11, 2017 02:09 AM2017-03-11T02:09:24+5:302017-03-11T02:09:24+5:30
होळी तोंडावर असतांना महागाईची झळ पुरण पोळीला जाणवली असून गत वर्षीच्या तुलनेत तिचे दर वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, महागाई असुनही काही छोटया विक्रेत्यांनी
- राहुल वाडेकर, विक्रमगड
होळी तोंडावर असतांना महागाईची झळ पुरण पोळीला जाणवली असून गत वर्षीच्या तुलनेत तिचे दर वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, महागाई असुनही काही छोटया विक्रेत्यांनी पुरणपोळयांचे दर वाढविलेले नाहीत. वरकरणी हा त्यांचा मोठेपणा वाटत असला तरी त्यातही त्यांनी बिझनेस फंडा वापरला आहे. पुरणपोळयांचा आकार व वजन यावर हे दर अवलंबुन असल्याने छोटया आकाराच्या पुरणपोळया २० रुपयांनी तर मोठया आकाराच्या पुरणपोळया ३० रुपयांनी विकल्या जाणार असल्याचे दर पाटीवर दिसत आहेत.
होळी म्हटंली की, तुपाच्या धारेसोबत गरम पुरणपोळी आठवते़ होळीला नैवेद्य दाखविला की, पुरणपोळीवर ताव मारायचा़ सध्याच्या आधुनिक युगामध्ये, धावपळीच्या जिवनात घरी पुरणपोळया करण्याचे प्रमाण कमी झाले असले तरीही शहरी भागातील अपवाद वगळता पालघर जिल्हयातील ग्रामीण भागातील अनेक गृहीणी घरीच पुरणपोळया बनवणे सोयीस्कर मानतात. तर बाहेरुन तयार पुरणपोळी घेण्याकडेही नोकरदार महिलांचा कल वाढलेला आहे़ मात्र, महागाईमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तयार पुरणपोळीची किंमत दहा रुपयांनी वाढली आहे़
सध्या मिठाईच्या दुकानातुन पुरणपोळयांची मोठया प्रमाणावर विक्री होत असते. या पार्श्वभुमीवर विक्रमगडमध्ये घरगुती पुरणपोळी बनविणाऱ्यांची संख्याही खुप आहे़ महागाईमध्ये वाढ झाली असली तरी, यंदा चांगल्याप्रकारे पुरणपोळयांची विक्री होईल, असा अंदाज विक्रमगड येथील पुरणपोळी विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे़ दरम्यान, होळी खरेदीची गर्दी वाढती आहे.
पुरणपोळी विक्रेत्यांनी मांडले महागाईचे गणित
याबाबत पुरणपोळयांच्या किमतीत दहा रुपयांनी वाढ झाल्याची कारणे सांगताना घरगुती पुरणपोळी विक्रेत्या विक्रमगड येथील महिला वंदना विलास वाडेकर सांगतात की, पुरणपोळया तयार करणाऱ्या महिला दिवसावर काम करतात़ आतापर्यत या महिला दिवसाला १५० रुपये घेत होत्या़ मात्र आता गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे़ लाकडांची मौळी देखील महाग झाली आहे. पुरणपोळी करीता लागणारे साहित्य चणाडाळ, गुळ, वेलची यांच्याही किंमती वाढलेल्या आहेत. गेल्या वर्र्षी २० रुपयांना मिळणारी मोठया आकाराची पुरणपोळीची किंमत ३० रुपये झाली आहे. या दराप्रमाणेच त्याची विक्री केली तर ते परवडणार आहे.