बेपर्वाईला लगाम नसल्यानेच निष्पापांचे जाताहेत बळी, चार दशकांत शेकडोंनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 11:51 PM2020-01-18T23:51:16+5:302020-01-18T23:51:26+5:30

तारापूर एमआयडीसीमध्ये आग, स्फोट आणि विषारी वायू गळतीबरोबरच इतर अनेक वेगवेगळ्या झालेल्या अपघातांमध्ये मागील चार दशकांमध्ये शेकडो जणांचा मृत्यू तर अनेकांना अपंगत्व आले आहे.

Innocent victims die due to negligence, hundreds lost life in four decades | बेपर्वाईला लगाम नसल्यानेच निष्पापांचे जाताहेत बळी, चार दशकांत शेकडोंनी गमावला जीव

बेपर्वाईला लगाम नसल्यानेच निष्पापांचे जाताहेत बळी, चार दशकांत शेकडोंनी गमावला जीव

Next

- पंकज राऊत
बोईसर : तारापूर एमआयडीसीमध्ये आग, स्फोट आणि विषारी वायू गळतीबरोबरच इतर अनेक वेगवेगळ्या झालेल्या अपघातांमध्ये मागील चार दशकांमध्ये शेकडो जणांचा मृत्यू तर अनेकांना अपंगत्व आले असूनही आतापर्यंत दोषी व जबाबदार असणाऱ्यांवर कठोर व ठोस कारवाई होत नसल्यानेच तारापूरमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. या ठिकाणच्या बेपर्वाईला कुणाचाच लगाम नसल्याने निष्पापांचे बळी जात आहेत.

औद्योगिक क्षेत्रात अपघात झाल्यानंतर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, कामगार विभाग, पोलीस इत्यादी सर्व विभागांचे अधिकारी चौकशी व तपासणी सुरू करतात, तर मंत्रीगण, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व पुढारी घटनास्थळी भेट देऊन जखमींची रुग्णालयांत जाऊन विचारपूस आणि मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करतात, तर मंत्रीगण पत्रकार परिषद घेऊन घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन देऊन निघून जातात.

मंत्रीगण, पुढारी त्यानंतर पुन्हा नव्याने अपघात झाल्यावरच परततात. पुन्हा मागीलप्रमाणे आश्वासने देतात. परंतु दुर्दैवाचा भाग म्हणजे दुर्घटनेनंतर संबंधित विभाग चौकशी व तपासणी करून जो प्राथमिक अहवाल पोलिसांना देतात, त्या अहवालाच्या आधारावर पोलीस गुन्हा दाखल करून पुढे सदर केस न्यायालयात पाठविल्यानंतर तारीख पे तारीख सुरू होते. मात्र त्याचे पुढे काय होते, ते समोरच येत नाही. दुसरीकडे दुर्घटनेत मृत्यू, जखमी किंवा कायमचे अपंगत्व आलेल्यांना नुकसानभरपाई पुरेसी दिली जात नाही. परिणामी त्यांच्या कुटुंबाला मोठे व कायमस्वरूपी आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. आजपर्यंत तारापूरमधील कुठल्याही उद्योजकांवर मोठ्या शिक्षेची कारवाई झाल्याचे एकही उदाहरण ऐकिवात नाही. तर दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी अनेक जण वृत्तपत्रांच्या माध्यमातून करून प्रसिद्धी मिळवतात, परंतु तेही पुढे पाठपुरावा करीत नसल्याने दोषी उद्योजकांवर पर्यायाने व्यवस्थापनावर वचक राहिला नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. मात्र भीषण आग, स्फोट किंवा विषारी वायू गळतीसारख्या दुर्घटना घडतात, तेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांना जीव धोक्यात घालून काम करावे लागते. त्यांना पोलिसांची मदत मिळते. हे दोन्ही विभाग तत्परतेने काम करताना दिसतात.

उत्पादन खर्च कमी करण्याच्या
नादात सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष

तारापूर एमआयडीसीमधील औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात धोकादायक रासायनिक कारखान्यांबरोबरच स्टील, टेक्स्टाईल, औषधांच्या निर्मितीकरिता लागणारा कच्चामाल, कीटकनाशक असे सुमारे बाराशे लहान-मोठे उद्योग आहेत. तर रासायनिक प्रक्रि या करताना अत्यंत विषारी आणि ज्वालाग्रही रसायनांचा वापर केला जातो. बहुसंख्य कारखान्यांमध्ये बॉयलर आणि रिअ‍ॅक्टर्स कार्यरत आहेत. या दोन्हीमधील तापमान मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वाढले तर त्याकरिता सेफ्टी वॉलसह अनेक उपकरणे सुस्थितीत असतील तर अपघाताची शक्यताच नसते. परंतु उत्पादन खर्च कमी करण्याच्या नादात सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले जाते तसेच विषारी वायू आणि ज्वलनशील पदार्थ वाहून नेणा-या पाइपलाइनच्या दुरु स्ती आणि देखभालीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. याचा परिणाम गंभीर दुर्घटनेत होतो.
 

Web Title: Innocent victims die due to negligence, hundreds lost life in four decades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर