त्या पत्रकारांवरील कारवाईची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:34 AM2018-06-29T01:34:34+5:302018-06-29T01:34:40+5:30
पोलीस ठाण्यात चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांना पोलिसांनी दिलेल्या क्रूर वागणुकीची चौकशी करण्यात येईल असा निर्वाळा पोलीस अधीक्षक सिंगे यांनी दिला आहे
पालघर : पोलीस ठाण्यात चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांना पोलिसांनी दिलेल्या क्रूर वागणुकीची चौकशी करण्यात येईल असा निर्वाळा पोलीस अधीक्षक सिंगे यांनी दिला आहे तर हे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या षडयंत्र मागचा खरा सूत्रधार कोण? तसेच पालघर पोलिसांनी आपल्या सीसीटीव्हीत ह्या प्रकरणाचे झालेले चित्रीकरण सर्वसामान्या समोर उघड करावे असे आव्हानच पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
पालघरच्या वाघोबा खिंडीत काही वाहनावर झालेल्या दगडफेकीच्या घटने नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीना पोलीस व्हॅनमधून आणले जात असतानाचे नेहमी प्रमाणे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या जेष्ठ पत्रकार राम परमार आणि हुसेन खान यांना पालघर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तौफिक सय्यद ह्यांनी मारहाण करून लॉक अप मध्ये टाकले. आणि पहाटे पर्यंत ७ तास डांबवून ठेवले पोनि.किरण कबाडी ह्यांच्या आदेशा नंतर त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले.ह्यावेळी घरी गेलेल्या परमार यांना त्यांच्या घरात घुसून त्यांची पत्नी, लहान मुलींच्या समोर पोलिसांनी फरफटत बाहेर काढले. परमार ह्यांना एखाद्या सराईत गुन्हेगारा प्रमाणे घरातून नेण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यावर ह्याची चौकशी केली जाईल असे पोलिस अधीक्षक सिंगे ह्यांनी सांगितले.
२२ जून च्या रात्री ११.३० वाजता ही घटना घडल्या नंतर पत्रकारांनी पोलीस अधीक्षक सिंगे ह्यांच्या कानी त्या घातल्या नंतर त्यांनी आपल्या कार्यालयातील उपनिरीक्षक हेमंत काटकर ह्यांना पाठवून चर्चे अंती लॉकअप मध्ये असलेल्या पत्रकार खान ह्यांना घरी जा असे सांगितले. मात्र लगेच तासभर थांबवून पुन्हा सिंगे ह्यांनी वाड्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे ह्यांना पाचारण केल्यावर झालेल्या चर्चेनंतर खान ह्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले. मात्र त्यांचा मोबाईल देण्याच्या नावाखाली थांबवून ठेवीत पोनि.कबाडी ह्यांनी खान आणि परमार ह्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले.एखाद्या घटनेची सखोल चौकशी केल्या नंतरच गुन्हे दाखल करणे अभिप्रेत असतांना फक्त सय्यद ह्यांच्या सांगण्यावरून पोलीस अधीक्षक सिंगे ह्यांनी गुन्हे दाखल करण्यास संमती दिली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झालेले चित्रीकरण पाहण्याची गरजही त्यांना भासली नाही. ह्या सीसीटीव्ही कॅमºयातील रेकॉर्डिंग झालेली वस्तुस्थिती उघड झाल्यास पोलिसांची नाचक्की होईल ह्या भीतीने कॅमेºयाची डिस्क खराब झाल्याचा बनाव पोलीस रचित असल्याचा आरोप जिल्हा पत्रकार संघाने केला आहे. पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न चालल्याचे ह्यावरून दिसून येत आहे.
या प्रकरणात सय्यद ह्यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करून पोलीस अधीक्षक आम्ही कारवाई केल्याचे भासवत असले तरी पत्रकारांना ७ तास डांबवून ठेवणे आणि परमार ह्यांच्या घरात शिरून त्यांना अटक करणाºया सय्यद यांना निलंबित करावे, अशी पत्रकारांची मागणी मात्र अधीक्षकांनी मान्य केलेली नाही. पालघर जिल्हा पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद, (मुंबई)पालघर, द प्रेस क्लब आॅफ वसई-विरार, वसई-विरार महानगर पत्रकार संघ यांनी व जेष्ठ पत्रकार अभय मोकाशी,जतीन देसाई आदिंनी ह्या प्रकरणी पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे ह्यांची बदली करावी,पोलीस निरीक्षक किरण कबाडी आणि उपनिरीक्षक तौफिक सय्यद यांचे तत्काळ निलंबन व्हावे अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.