मारकुट्या मुख्याध्यापकाची चौकशी सुरू
By admin | Published: January 9, 2017 06:14 AM2017-01-09T06:14:15+5:302017-01-09T06:14:15+5:30
डहाणू तालुक्यातील अस्वाली आश्रमशाळेतील मुख्याध्यापक यशवंत लक्ष्मण वाघ यांनी ३१ डिसेंबेरच्या रात्री विद्यार्थ्यांना मारहाण
अनिरु द्ध पाटील / बोर्डी
डहाणू तालुक्यातील अस्वाली आश्रमशाळेतील मुख्याध्यापक यशवंत लक्ष्मण वाघ यांनी ३१ डिसेंबेरच्या रात्री विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी आँचल गोयल यांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान संबंधित मुख्याध्यापकाला तत्काळ निलंबित करण्याची मागणी
विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांनी केली आहे.
एकात्मिक आदिवासी प्रकल्प डहाणू कार्यालयांअतर्गत बोर्डीनजीक अस्वाली आश्रमशाळा आहे. तिचे मुख्याध्यापक यशवंत लक्ष्मण वाघ यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून मध्यरात्रीच्या सुमारास ३५ ते ४० विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली. या मध्ये ५ वी ते ९ वीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दरम्यान वाघ यांच्या दंडुकेशाही व दडपशाही विरोधात विद्यार्थ्यांनी संघटित होऊन प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रकल्प अधिकारी आँचल गोयल यांनी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत वाघ यांची चौकशी सुरू केली आहे.
प्रथमदर्शनी विद्यार्थ्यांना थोडीफार शिक्षा केल्याचे वाघ यांनी चौकशीत मान्य केले आहे. या प्रकरणी वाघ यांचे लेखी स्टेटमेंट घेतले जाणार असून त्यानंतर शासकीय कार्यवाही पूर्ण केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे प्रकल्प अधिकारी गोयल यांनी लोकमतला सांगितले.
दरम्यान या प्रकरणांचे तीव्र पडसाद उमटले असून विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी वाघ यांना निलंबित करणाची मागणी केली आहे. आदिवासी आश्रमशाळेतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य शासनाने संसदीय कमिटी नियुक्त केली आहे. त्यामध्ये विधानसभा व विधानपरिषदेच्या एकूण १२ महिला आमदारांचा समावेश आहे.
आमदार विद्या ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामिटीचा पालघर जिल्ह्यातील दौरा आचारसंहितेमुळे रद्द करण्यात आला. दरम्यान या कमिटीच्या माध्यमातून आश्रमशाळेतील गैरप्रकारांना आळा बसेल असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे.