सलग चार दिवस पाऊस झाल्यास मिळणार विमा, चिकू पीक विम्याची नवीन अट जाचक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 12:37 AM2019-08-16T00:37:20+5:302019-08-16T00:38:04+5:30
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना मृग बहरासाठी चिकू फळालाही लागू आहे.
बोर्डी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना मृग बहरासाठी चिकू फळालाही लागू आहे. मात्र, यावर्षी नव्याने प्रमाणके निश्चित करताना २० मिमी पावसाच्या अटीचा समावेश केल्याने या लाभापासून उत्पादक वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे ही अट शिथिल करण्याची मागणी चिकू उत्पादकांनी या योजनेचे जिल्हास्तरीय अध्यक्ष आणि पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे.
कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरांमध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. पिकाचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटा मोठा असतो. यासाठी फळपिकांना हवामान धोक्यापासून विमासंरक्षण देऊन आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने विमा योजना राबविण्यात येते. पालघर जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या चिकू या फळाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या लाभासाठी प्रमाणके निश्चित करण्यात आली आहेत. १ जुलै ते ३० सप्टेंबर या काळात सापेक्ष आर्द्रता सलग पाच दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्यास आणि प्रतिदिन २० मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस सलग चार दिवस झाल्यास प्रतिहेक्टर २५ हजार तर आठ दिवस राहिल्यास ५५ हजार देय राहणार आहे.
यावर्षी २० मिमी पावसाच्या अटीचा नव्याने समावेश करण्यात आल्याने चिकू उत्पादक या लाभापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण, मुसळधार पावसानंतर पुढील काही दिवस पाऊस न झाल्यास, आर्द्रता निर्माण होऊन त्याचा फटका बागांना बसू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याला कृषी शास्त्रज्ञांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे ही अट तत्काळ शिथिल करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन उत्पादकांकडून या योजनेचे जिल्हास्तरीय अध्यक्ष जिल्हाधिकारी शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती कृषिभूषण यज्ञेश सावे यांनी दिली. यापूर्वी केवळ आर्द्रतेची अट होती, त्यामुळे विम्याचा लाभ उत्पादकांना मिळत होता. पावसाच्या या नवीन अटीचा समावेश करताना, पुणे येथे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सभेत त्याला विरोध करण्यात आला. मात्र मागणी फेटाळल्याची माहिती उपस्थित चिकू उत्पादकांच्या प्रतिनिधींनी दिली.
चिकू विम्याच्या अटींमध्ये २० मिमी पावसाच्या अटींचा समावेश केल्याने, जिल्ह्यातील बागायतदार या योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे. नुकसानामुळे उत्पादक देशोधडीला लागणार असून मजूरवर्गावर परिणाम होईल, त्यामुळे ती अट वगळण्यात यावी.
- देवेंद्र राऊत, चिकू बागायतदार, नरपड
मुसळधार पाऊस झाल्यानंतर पुढील २ ते ३ दिवस पाऊस न होताही आद्रता वाढून चिकू बागायतीचे नुकसान होऊ शकते.
- प्रा. विलास जाधव,
शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान
केंद्र, कोसबाड
डहाणू तालुक्यात २८३० हेक्टर क्षेत्रावर विमा उतरावलेले असून २६०२ लाभार्थी आहेत. तर या जिल्ह्यात उत्पादनक्षम चिकू झाडांचे क्षेत्र सुमारे ७ हजार हेक्टर आणि या तालुक्याचे क्षेत्र ४ हजार हेक्टर आहे.
- संतोष पवार,
तालुका कृषी अधिकारी, डहाणू