आंतरराष्ट्रीय योगदिनी पालघर जिल्ह्यात कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:52 PM2019-06-21T22:52:02+5:302019-06-21T22:52:12+5:30
वाड्यात कार्यक्रमाचे आयोजन; डहाणूत विक्रमी सहभाग
वाडा : आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालय व वाडा पंचायत समितीच्यावतीने वाड्यात आयोजित करण्यात आला होता तर तालुक्यातील विविध शाळा, कॉलेजच्या वतीनेही योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शासकीय कर्मचारी व विद्यार्थी वर्गाने सहभाग घेऊन जागतिक योग दिन साजरा केला.
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालय व पंचायत समिती वाडा यांच्यावतीने येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिरातील नूरबाग सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात आरोग्य अधिकारी डॉ.दत्तू सोनावणे यांनी योगाचे महत्त्व सांगून व प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांकडून आसने करवून घेतलीत. या कार्यक्रमात पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, तहसीलदार दिनेश कुºहाडे, वाड्याच्या नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, नायब तहसीलदार रिताली परदेशी, गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांच्यासह अनेक अधिकारी सहभागी झाले होते.
डहाणूत एकलक्ष विद्यार्थ्यांनी योग दिन केला साजरा
डहाणू/बोर्डी :जागतिक योग दिन शालेयस्तरात साजरा करण्यात यावा, असे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले होते. त्याअनुषंगाने या तालुक्यातील सुमारे एकलक्ष विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली.
यामध्ये जिल्हा परिषदेच्या ४६० प्राथमिक शाळेतील ४४,१६० विद्यार्थ्यांचा तर १०६ सर्व माध्यमांच्या माध्यमिक शाळेतील ४३,४८६ आणि मूकबधीर व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन अशा एकूण एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. शिक्षक आणि अन्य शासकीय कार्यालयीन कर्मचारी, विविध संस्था आदींनी त्यामध्ये भाग घेतला तर रांगोळी कलाकार अमित बारी यांनी सुरेख रांगोळी चितारली होती. ती सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना योगाची विविध प्रात्यक्षिके शिकविण्याकरिता शिक्षकांनी अल्प कालावधीत विशेष मेहनत घेतल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी विष्णू रावते यांनी दिली.
श्रीराम सेंटेनिअल स्कूलमध्ये उत्साहात
बोईसर :पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन कुरगाव, बोईसर जवळील कुरगाव येथील विराज श्रीराम सेंटेनिअल स्कूलमध्ये उत्साहाने साजरा केला गेला. यामधे सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सर्वांग सुंदर अशी योगासने करून जागतिक योग दिनास आपली सलामी दिली. नर्सरीच्या बालवयातील विद्यार्थ्यांपासून ते इयत्ता १२ वीपर्यंतच्या तरुण विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक वृंद यांनी योगदिनाचे औचित्य साधत आपल्या योग कौशल्याचे सादरीकरण केले आणि आपले शरीर, मन आणि देश सुदृढ सशक्त बनविण्याचा संकल्पही केला. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्र मात आधी साधी सोपी आणि सुलभ आसने केलीत. नंतर अवघड आसनांचा अभ्यास व सादरीकरण करण्यात आले तर जागतिक दिनाचेनिमित्त साधून सदर कार्यक्र मात योगासनांच्या स्पर्धाही घेण्यात आल्या. सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनिअर अशा तीन गटांमध्ये मुलामुलींनी आपापली योग कौशल्य परिक्षकांसमोर प्रदर्शित केली.
कासा हायस्कूलमध्ये योग दिन साजरा
कासा : डहाणू तालुक्यातील कासा हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. क्र ीडा शिक्षक डॉ.नीलेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना यावेळी विविध आसने करून दाखविलीत. यावेळी ताडासन, भुजंगासन, हलासन, वृक्षसन, सीद्वसन, पवन मुक्तसन, सर्वागासन आदी योगासणाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.बी.परदेशी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे जीवनातील महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कासा परिसरातील जिल्हा परिषद शाळेत ही योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक अरुण खंबायत, हरेश मुकणे, भरत ठाकूर, विलास चौरे आदी होते.
तलासरीत योग दिन विद्यार्थ्यांना योगाचे धडे
तलासरी : शुक्र वारी झालेल्या योग दिनी तलासरीमधील शाळांत योग दिन साजरा करण्यात येऊन विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले. तलासरी तालुक्यातील जिल्हापरिषद व माध्यमिक विद्यालयात योग दिन साजरा झाला.
पोलीस ठाण्यात योग दिन
नालासोपारा : २१ जून हा दरवर्षी योगदिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग दिन साजरा करण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात उत्साहात योग दिन साजरा झाला.
अंध व मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत योग दिन
विक्र मगड- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित ओमकार अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा झडपोली या शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिन सकाळी सात वाजता साजरा करण्यात आला. या योगा दिनानिमित्त मुलांना शिक्षकांनी योगाचे महत्त्व सांगितले व या शाळेतील अंध व मतिमंद मुलांनी योगाच्या आसनांचे प्रात्यक्षिके सादर केले. यामध्ये ताडाआसन, नौकाआसन, वज्राआसन, धनुरासन इत्यादी आसने मुलांनी मोठ्या उत्साहाने सादर केलीत. या ठिकाणी शिक्षकांनी आसने करण्यासाठी मुलांना मदत केली. या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला..