बविआकडून अडवणूक?, राष्ट्रवादीची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:34 AM2020-03-04T00:34:13+5:302020-03-04T00:34:18+5:30
जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता असून उद्या (बुधवारी) चार सभापतीपदांची निवड होणार आहे.
हितेन नाईक
पालघर : जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता असून उद्या (बुधवारी) चार सभापतीपदांची निवड होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात ही निवड होणार आहे. एकूण चार समित्यांमधील दोन-दोन समिती सेना, राष्ट्रवादी पक्षात समसमान वाटल्या गेल्या असल्या तरी एक सभापतीपद मिळण्यासाठी बहुजन विकास आघाडी अडून बसल्याने राष्ट्रवादीसमोरील अडचण वाढली आहे.
बुधवारी होणाऱ्या जिल्हा परिषद समित्यांच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षात वाटाघाटी सुरू असून वरिष्ठ पातळीवर सकाळपासून चर्चा सुरू आहे. एकूण चार समित्यांमधील जिल्हा परिषद अध्यक्षांकडे जलसंधारण आणि स्थायी समितीचे पदसिद्ध सभापतीपद असते. तर उपाध्यक्षकडे शिक्षण समितीचे तसेच वित्त हे पदसिद्ध सभापतीपद असते. त्यामुळे उद्या बांधकाम-आरोग्य, समाज कल्याण, कृषी-पशूसंवर्धन आणि महिला-बालकल्याण या चार विभागाच्या सभापती पदांची निवड करण्यात येणार आहे. या समितीमधील दोन समित्या शिवसेनेला आणि दोन समित्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, या चारही समितीच्या सभापतीपदी कोण बसणार यांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटपाला येणाºया बांधकाम सभापतीपदी काशीनाथ चौधरी, नरेश आकरे आदींची नावे समोर आली असली तरी अजून कुठलेही नाव निश्चित करण्यात आले नसल्याचे आ. सुनील भुसारा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दुसरीकडे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी उपाध्यक्ष निलेश सांबरे आरोग्य विभागाचा कारभार स्वत:कडे ठेवण्यास इच्छुक असल्याचे कळते. तसेच जर बांधकाम सभापतीपद अन्य सदस्याकडे गेल्यास समाजकल्याण सभापतीपद काशिनाथ चौधरींना मिळण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेनेच्या वाट्याला येणाºया दोन समित्यांच्या सभापती पदासाठी पक्षातील ताकद पणाला लावून वरिष्ठांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न काही सदस्यांनी सुरू केले आहेत. शिवसेनेमध्ये वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याची पद्धत असली तरी मंत्री एकनाथ शिंदे आणि संपर्कमंत्री तथा आ. रवींद्र फाटक यांच्या मर्जीतील सदस्यांचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.
उद्या पालघरच्या शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीची बैठक तर सेनेचे गणित मंगळवारी रात्रीच ठाण्यातून निश्चित होणार असल्याचे समजते. सध्यातरी निवडून आलेले कोणीही सदस्य आपली इच्छा उघडपणे व्यक्त करताना दिसून येत नसले तरीही कृषी व पशुसंवर्धन समितीसाठी सुशील चुरी यांचे नाव आघाडीवर असून महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती पदासाठी विनया पाटील आणि अनुष्का ठाकरे यांच्यात चुरस असली तरी विनया पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे कळते.
>विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी - बविआची होती युती
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-बहुजन विकास आघाडी एकत्र लढले होते. तसेच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपद निवडणुकीतही बिनविरोध निवड होण्यासाठी बविआने माघार घेतली होती. ही आघाडी पुढेही टिकून वृद्धिंगत व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक सभापतीपदाची मागणी बविआने केल्याचे कळते. याबाबत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठाने लोकमतला सांगितले. वरिष्ठ पातळीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याशी बविआचे वरिष्ठ चर्चा करीत असल्याची माहिती पुढे येत असून हे पद बविआकडे गेल्यास राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या सदस्यामध्ये निराशा पसरणार आहे.