दरोडा घालून जबरी चोरी करणाऱ्या सराईत आंतरराज्यीय टोळीला अटक; ऍटोमॅटिक पिस्टल, धारदार शस्त्रांसह मुद्देमाल हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 06:55 PM2024-08-27T18:55:10+5:302024-08-27T18:56:17+5:30
या आरोपींकडून ४ गुन्ह्यांची उकल करून ऍटोमॅटिक पिस्टल, धारदार शस्त्रांसह इतर मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
नालासोपारा (मंगेश कराळे) : दरोडा घालून जबरी चोरी करणाऱ्या ५ आरोपींच्या सराईत आंतरराज्यीय टोळीला माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून ४ गुन्ह्यांची उकल करून ऍटोमॅटिक पिस्टल, धारदार शस्त्रांसह इतर मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
वसईच्या दिवाण टॉवरमधील डी के एन्टरप्राईजेस कार्यालयात १९ ऑगस्टला दुपारी सिद्धराज राजपूत (२२) हे काम करत असताना पाच आरोपी आले. त्यातील एका आरोपीने डोक्याला पिस्तुल लावून ओरडला तर ठोकून टाकेल ड्राव्हरमध्ये असलेले पैसे काढ असे बोलून दुसऱ्याने चॉपर काढून त्याच्या मानेला लावला. सिद्धराज याचे हातपाय बांधून जीवे ठार मारण्याची धमकी देत २ मोबाईल, रोख रक्कम, डिव्हीआर असा एकूण ७३ हजार ७०० रुपयांच्या मुद्देमालाची चोरी करून पळून गेले. माणिकपूर पोलिसांनी दरोडा, आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयातील आरोपींच्या शोधासाठी वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासून व तांत्रिक विश्लेषण व बातमीदार यांच्या मदतीने आरोपी अजय मंडल (३७), शंकर गौडा (५०), विजय सिंग (५५), मोहम्मद जुबेर शेख (३२) आणि लालमणी यादव (३६) या ५ जणांच्या सराईत टोळीला ताब्यात घेऊन अटक केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी ऍटोमॅटिक पिस्टल, ८ जिवंत काडतुसे, इको कार, चॉपर, चाकू, कटर मशीन, हँडल बार त्याचे शॉकेट, पाने, स्क्रू ड्रॉइव्हर, पक्कड, कटर, हातोडी, चाव्या, मोबाईल व इतर साहित्य असे एकूण ३ लाख १४ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी शंकर गौडावर १० गुन्हे, विजय सिंगवर ५ गुन्हे, अजय मंडलवर ६ गुन्हे असे तिघांवर यापूर्वीच २१ गुन्हे दाखल आहेत. आता या ५ आरोपीकडून ४ गुन्ह्यांची उकल माणिकपूर पोलिसांनी केली आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे यांचे मार्गदर्शनाखाली माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सनील पाटील, सागर साबळे, पोलीस हवालदार शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, प्रविण कांदे, गोविंद लवटे, आनंदा गडदे, पुजा कांबळे, भालचंद्र बागुल, अमोल बर्डे आणि मोहन खंडवी यांनी केली आहे.