पुण्याच्या कमिटीकडून ‘नवोदय’ची चौकशी; ११वीच्या विद्यार्थ्यांची ३५ जणांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 03:03 PM2023-10-10T15:03:12+5:302023-10-10T15:03:41+5:30
यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुण्याच्या केंद्रीय कमिटीच्या माधुरी उदय शंकर यांनी शाळेला भेट देत चौकशीला सुरुवात केली आहे.
पालघर : वडराई येथील जवाहर नवोदय विद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावी इयत्तेतील ३५ विद्यार्थ्यांना शिक्षेच्या रूपात मारहाण करून रॅगिंग करण्यात आल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला होता. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुण्याच्या केंद्रीय कमिटीच्या माधुरी उदय शंकर यांनी शाळेला भेट देत चौकशीला सुरुवात केली आहे.
केंद्र शासन अनुदानित असलेले वडराई येथील नवोदय विद्यालयात ग्रामीण भागातील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांमधील ११वी इयत्तेतील ७ विद्यार्थ्यांनी दहावी इयत्तेतील सुमारे ३५ विद्यार्थ्यांना बोलावीत त्यांचे रॅगिंग केल्याचा प्रकार ३० सप्टेंबर रोजी घडला होता. या मारहाणीत अनेक मुले जखमी झाली. कोणाच्या कानाचे पडदे फाटणे, नाकातून रक्त येणे, काहींच्या गुप्तांगावर लाथा मारण्यात आल्या आहेत. या गंभीर घटनेची माहिती समोर आल्यानंतर शाळा व्यवस्थापन, प्रिन्सिपॉल यांनी हे प्रकरण हलकेपणात घेत विद्यार्थ्यांना चूप राहण्याची समज दिल्याचे पालकांनी सांगितले.
शाळेबाबत आढळल्या त्रुटी
शाळेसंदर्भात काही त्रुटी असल्याचे सहाय्यक आयुक्तांनी मान्य करीत त्यावर उपाययोजना करून शाळेची गुणवत्ता सुधारण्याबाबत नक्कीच उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले. मात्र, विद्यार्थ्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाईचा निर्णय हा प्राचार्यांनी घ्यायचा असल्याने या विद्यार्थ्यांनी रॅगिंगचा प्रकार केला होता का? याची चौकशी होणार असून, ११ वी इयत्तेतील दोन-तीन विद्यार्थ्यांवर याप्रकरणी कडक कारवाईचे संकेत मिळत आहेत. विद्यार्थ्यांचा वर्तणूक अहवाल सादर केला जाणार असून, विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीबाबत तक्रारी असल्याने याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
या मारहाण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पुण्याहून नवोदय विद्यालय समितीच्या विभागीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त माधुरी शंकर यांनी सोमवारी नवोदय विद्यालय पालघर येथे भेट दिली. सकाळपासूनच त्यांनी चौकशीला सुरुवात केली आहे.