वीजबिल वसुलीसाठी प्रबाेधनातून साद; वरिष्ठ अधिकारी फिल्डवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 02:06 AM2021-03-21T02:06:19+5:302021-03-21T02:06:38+5:30

सुटी दिवशीही भरणा केंद्र सुरू, शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी अभियान

Invocation for recovery of electricity bill; Senior officers on the field | वीजबिल वसुलीसाठी प्रबाेधनातून साद; वरिष्ठ अधिकारी फिल्डवर

वीजबिल वसुलीसाठी प्रबाेधनातून साद; वरिष्ठ अधिकारी फिल्डवर

Next

नालासोपारा : महावितरणच्या वसई मंडल कार्यालयांतर्गत सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी विविध उपक्रमांद्वारे जागृती केली जात आहे.घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांसह सरकारी आस्थापनांकडून मार्चमध्ये सुमारे २९० कोटींचा भरणा अनिवार्य आहे. तर चालू वीज बिल भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीवर सुमारे ६६ टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी महाकृषी ऊर्जा पर्व अभियानाद्वारे ग्राहकांचे प्रबोधन सुरू आहे. 

मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, क्षेत्रीय अभियंते, अधिकारी, जनमित्र मोहिमेत सहभागी झाले आहेत. ‘माझे वीजबिल, माझी जबाबदारी’ ही संकल्पना रुजवून ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी वसई, विरार, नालासोपारा, वाडा, आचोळे भागात रॅली, ग्राहक संवाद असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्चअखेरपर्यंत आणखी १०७ कोटींच्या वीजबिलाची वसुली आवश्यक आहे. यात पाच हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणारे जवळपास ५९ हजार ग्राहक असून त्यांच्याकडे १०७ कोटींची थकबाकी आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. मार्चमध्ये आतापर्यंत वसई मंडलातील दाेन लाख ७७ हजार लघुदाब ग्राहकांनी १०४ कोटींचे वीजबिल ऑनलाइन भरले आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ऑनलाइन वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वसई मंडलात ५.१२ काेटींची थकबाकी
महाकृषी ऊर्जा पर्व अभियानांतर्गत कृषिपंप ग्राहकांचे मेळावे, संपर्क अभियान व प्रबोधन, थकबाकीमुक्त ग्राहकांना प्रमाणपत्र वाटप, शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण आदी उपक्रम मंडळात राबवण्यात येत आहेत. वसई मंडलात एकूण पाच हजार २६६ कृषिपंप ग्राहक आहेत. त्यांच्याकडे पाच कोटी १२ लाखांची थकबाकी आहे. योजनेतील तरतुदीमुळे ही थकबाकी चार कोटी १६ लाखांपर्यंत कमी झाली आहे. चालू बिलासह दाेन कोटी आठ लाखांचा भरणा केल्यास मंडलातील सर्व शेतकरी थकबाकीमुक्त होतील. थकबाकीतील ५० टक्के रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्याची ५० टक्के थकबाकी माफ होणार आहे. आतापर्यंत १४१४ कृषिपंप ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिलाचे ६० लाख भरून सहकार्य केले आहे.

विक्रमगड : महावितरण कंपनीने विक्रमगड तालुक्यातील थकबाकीदार ग्राहकांकडून सक्तीने वीजबिल वसुलीला सुरुवात केली आहे. वीजबिल भरणा केला नाही, तर वीज कनेक्शन तोडले जात आहे. हे अन्यायकारक असून या थकीत बिलांना महावितरण जबाबदार आहे. थकीत वीजबिलधारकांचे वीज कनेक्शन तोडू नका, असा इशारा कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव काॅ. किरण गहला यांनी दिला आहे. आदिवासी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असून, मोठ्या प्रमाणात आलेली वीजबिले कशी भरणार? यासाठी सक्ती नको. हे वीज कंपनीने थांबविले नाही, तर   माकप तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा गहला यांनी दिला आहे.

Web Title: Invocation for recovery of electricity bill; Senior officers on the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.