बोटोशीत ‘जिजाऊ’ उभारणार लोखंडी पूल; स्वखर्चातून करणार काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 12:17 AM2020-12-04T00:17:39+5:302020-12-04T00:17:44+5:30
बोटोशी येथील जिजाऊ संस्थेच्या शाखांचे उद्घाटन सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात निलेश सांबरे यांच्या हस्ते या लोखंडी पुलाचे भूमिपूजनदेखील करण्यात आले.
मोखाडा : बोटोशी येथे इतर गावांना जोडणारा पूल नसल्याने पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटतो. तसेच पावसाळ्यात येजा करताना अनेक माणसे नदीच्या प्रवाहात वाहूनदेखील गेली आहेत. याची निलेश सांबरे यांनी गंभीरतेने दखल घेऊन बोटोशी येथे जिजाऊ संस्था स्वखर्चातून लोखंडी पूल उभारणार आहे. यामुळे बोटोशी येथील ग्रामस्थ आता चिंतामुक्त झाले आहेत. त्यांना पावसाळ्यात किंवा इतरही काळात इतर गावांत जाण्यासाठी दगदग करावी लागणार नाही.
बोटोशी येथील जिजाऊ संस्थेच्या शाखांचे उद्घाटन सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात निलेश सांबरे यांच्या हस्ते या लोखंडी पुलाचे भूमिपूजनदेखील करण्यात आले. यावेळी सांबरे यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. या भागात जातीने लक्ष घालून येथील आदिवासींचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करू. बेरोजगार तरुणांना गावातल्या गावात रोजगार उपलब्ध करून देऊ. त्याचबरोबर येथील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन येथून जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंत्रालयात उच्चपदावर असलेले अधिकारी निर्माण करण्यासाठी जिजाऊ कटिबद्ध राहील.
आपण समाजाला देणं लागत असतो, या समाजसेवी भावनेतून हे काम अविरतपणे सुरू राहील. तसेच आपल्याशी निगडित कोणतीही समस्या असो, आम्ही सदैव सोडवण्यासाठी तत्पर राहू, असेही सांबरे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हबीबभाई शेख, रविंद्र खुताडे, जावेद खान, रोहित चक्रवर्ती आदी उपस्थित होते.
ग्रामस्थ आनंदित
आम्ही कुणालाही खिंडार पाडायला आलेलो नाही. येथील आदिवासींचा विकास करायला आलो आहोत. तसेच येथील ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता बोटोशी येथे पूल उभारणार असल्याचे सांबरे यांनी सांगितले. यामुळे येथील गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते.
तालुक्यात १८ शाखा
तालुक्यातील शिरसगाव, सूर्यमाळ, केवनाळे, गमघर, बोटोशी, पाथर्डी-१, पाथर्डी-२, खोडाळा, जोगलवाडी, वाकडपाडा, कोचाळे, किनिस्ते, हट्टीपाडा, कोशिमशेत, शेंड्याची मेट, निकमवाडी, पळसुंडे, चिकाटीपाडा येथील १८ गावांमध्ये जिजाऊ शाखांचे उद्घाटन करण्यात आले.