आयर्नमॅन हार्दिक पाटीलचा नवा विक्रम; अल्ट्रामॅन फ्लोरिडा २०२४ स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 02:26 PM2024-02-21T14:26:19+5:302024-02-21T14:26:58+5:30
अल्ट्रामॅन या स्पर्धेचा कालावधी हा ३ दिवसांचा असतो.
नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारचा आयर्नमॅन अशी ओळख असलेल्या हार्दिक पाटीलने आता आपल्या नावावर नव्या विक्रमाची नोंद केली आहे. यापूर्वी अनेक अर्थ व पुर्ण आयर्नमॅन स्पर्धा देश विदेशात जाऊन हार्दिकने यशस्वीरित्या सफल केल्या आहेत. त्यांच्या विक्रमी नोंदींमध्ये आणखी एक महत्वपूर्ण व विक्रमी स्पर्धेची व ती स्पर्धा ठराविक वेळेत यशस्वीरित्या पूर्ण करण्याची भर पडली आहे.
अल्ट्रामॅन फ्लोरिडा २०२४ हि स्पर्धा सलग तीन दिवसांत अमेरिकेतील फ्लोरिडा याठिकाणी सातासमुद्रापार परदेशात पुर्ण करत हार्दिकने देशाचे तसेच महाराष्ट्राचे नाव उंचावले असून त्याने भारताचा झेंडा अटकेपार फडकवला आहे. फ्लोरीडा येथे ९, १० व ११ फेब्रुवारीला अल्ट्रामॅन फ्लोरिडा स्पर्धेत सहभागी होऊन विक्रमी वेळेत त्याने हि स्पर्धा पार केली आहे.
अल्ट्रामॅन या स्पर्धेचा कालावधी हा ३ दिवसांचा असतो. प्रत्येकी दिवसाला १२ तास याप्रमाणे १० किमी जलतरण, ४२० किमी सायकलिंग, ८५ किमी धावणे अशी ही स्पर्धा पूर्ण करावयाची असते. मात्र अवघ्या ३१ तास ४६ मिनिटांत हार्दिकने ही स्पर्धा विक्रमी वेळेत पार करत आपल्या नावावर अल्ट्रामॅनचा छापा उमटवला आहे. संपूर्ण जगामधून १७ देशातील ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ६ स्पर्धक है भारतीय होते. ६ पैकी फक्त ४ स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली असून या ४ भारतीय स्पर्धकांपैकी ३ स्पर्थक महाराष्ट्रामधील तर १ दिल्ली येथील रहिवासी होते.
पहिला दिवस :- १० किमी स्वीमिंग (४ तास ५ मिनिटे)
१४५ किमी सायकलिंग (५ तास २० मिनिटे)
दुसरा दिवस :- २७५ किमी सायकलिंग (१० तास ४५ मिनिटे)
तिसरा दिवस :- ८५ किमी धावणे (११ तास १० मिनिटे)
हार्दिक हा भारतीय स्पर्धक सर्वात जलद ही स्पर्धा पूर्ण करणारा भारतीय ठरला आहे. आजतोवरच्या इतिहासात फक्त १८ भारतीय स्पर्धकांनीच हि स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. खेळाडूच्या जिद्दीची कसं पहाणारी हि स्पर्धा आजपर्यंत ७० ते ८० टक्के लोकंच यशस्वीरित्या पूर्ण करत असतात. हार्दिकच्या या कामगिरीचा पालघर, विरार वसईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटला आहे. त्याच्या या यशामुळे पालघर, ठाणे, जिल्ह्यासह देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हार्दीकने यापुर्वी जगभरात आयर्नमॅन तसेच जागतिक मॅरेथॉन स्पर्धा यांमध्ये सहभाग घेऊन अनेक विक्रमांची नोंद केली आहे. त्यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तब्बल आठ वेळा, वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये चार वेळा आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सहा वेळा नोंद केली आहे. येणाऱ्या काळामध्ये पालघर, ठाणे जिल्ह्यातील खेळाडूसाठी चांगल व्यासपीठ म्हणून स्पोर्ट क्लब देखील उघडणार असल्याचा त्याचा मानस आहे.