अर्नाळा पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन, पालघरमधील पहिले पोलीस ठाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 01:34 AM2019-08-17T01:34:41+5:302019-08-17T01:35:08+5:30
पालघर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांपैकी वसई तालुक्यातील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाले आहे. पालघर जिल्ह्यातील ते पहिले पोलीस पोलीस ठाणे ठरले.
नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांपैकी वसई तालुक्यातील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाले आहे. पालघर जिल्ह्यातील ते पहिले पोलीस पोलीस ठाणे ठरले.
कार्यालयीन स्वच्छता, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, नियोजन, कामाची गती या विविध १४ निकषांवर हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याआधी वसई अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाला आयएसओ नामांकन मिळालेले होते. त्यानंतर प्रथमच जिल्ह्यातील पोलीस ठाण्याला आयएसओ नामांकन मिळाले आहे. गुरुवारी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या हस्ते अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले.
उत्तम आणि दर्जेदार उत्पादन करणाºया कंपन्यांना आयएसओ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकन दिले जात होते. सेवा देणाºया संस्थांनाही आता ते देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच सर्व संस्थांना चांगले काम करून आयएसओ प्रमाणपत्र मिळविण्याचे आवाहन केले होते. गंभीर गुन्ह्यांची प्रलंबित प्रकरणे ४० टक्क्यांपेक्षा कमी आहेत, नागरिकांशी बोलताना पोलीस कर्मचाऱ्यांचे वर्तन कसे आहे, नागरिकांना योग्य वागणूक मिळते का, कार्यालयातील वाहनांची स्थिती कशी आहे, प्रसाधनगृह आहे का, नागरिकांनी केलेल्या ईमेल्सला कसा प्रतिसाद दिला जातो, कामकाजाच्या वेळी नियमांचे पालन होते का, सीसीटीव्ही कॅमेरे योग्य लावण्यात आलेले आहेत का आदी बाबी तपासण्यात आल्या.
हे प्रमाणपत्र तीन वर्षे राहणार आहे. त्या कालावधीत संस्थेचे सदस्य निकषांची पूर्तता होते अथवा नाही, त्याची नियमित पाहणी करणार आहेत. वसई अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या कार्यालयाला आयएसओ 9001: 2015 हे प्रमाणपत्र नोव्हेंबर २०१८ मध्ये मिळाले होते. यासाठी लागणारे सर्व १४ निकष अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यलयाने पूर्ण केले होते. त्यानंतरच त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर विजयकांत सागर यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आवाहन केले होते.
हा आमच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. हे प्रमाणपत्र गुरु वारी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याला मिळाले असून बाकी पोलीस ठाण्यांना देखील याबाबत प्रोत्साहन देणार आहे असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले आहे. नागरिकांना अधिकाअधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.