तारप्याच्या धूनवर थिरकणार पावलं
By admin | Published: January 26, 2016 01:53 AM2016-01-26T01:53:29+5:302016-01-26T01:53:29+5:30
भारतीय समाज संस्कृतीची प्रतीके ६६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानीत पाहायला मिळणार असली तरी स्वत:च्या संस्कृ तीचा वारसा मोठ्या अभिमानाने सांगणारे
तलवाडा : भारतीय समाज संस्कृतीची प्रतीके ६६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानीत पाहायला मिळणार असली तरी स्वत:च्या संस्कृ तीचा वारसा मोठ्या अभिमानाने सांगणारे तालुक्यातील आदिवासीबांधव तारप्याच्या धूनवर अनेकांना आपली पावले थिरकायला लावणार आहेत. निमित्त विविध कार्यालयांतील सरकारी कार्यक्रमांचे असले तरी आपल्या पारंपरिक पोशाखात तालासुरात नाचणारे वारली तरुण-तरुणी आपल्या परंपरा जपताना दिसतात.
सध्याचे युग आधुनिक युग म्हणून ओळखले जात आहे़ शहराबरोबरच ग्रामीण खेड्यापाड्यांची रचना व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत़ मात्र, विक्रमगडच्या ग्रामीण भागात आजही आपल्या प्राचीन परंपरा, नृत्यकला, रूढी जपलेल्या असून पूर्वजांच्या खुणा नवीन पिढीला संस्कृतीच्या रूपाने देत आदिवासी समाजातील घरोघरी फिरणारे पेरण म्हणजेच तारपानृत्य पाहायला मिळत आहे. हे तारपा नृत्य म्हणजे आदिवासींचे वैशिष्ट्य पूर्ण कलानृत्य आहे़ एखाद्या सणाच्या १५ ते २० दिवसांपासून खेड्यापाड्यांत तारपानृत्याचा सराव संध्याकाळी केला जात असे़ त्यास पेरण असे संबोधले जाते़
या नृत्यास आदिवासी समाजामध्ये विशेष महत्त्व दिले जाते़ कारण, हे त्यांना आपल्या पूर्वजांपासून मिळालेली एक कला आहे़ ही पेरण आदिवासी सणावारास घरोघरी जाऊन साखळीनृत्य करतात़ तर, एखादा मंत्री, कार्यालयाचे उद्घाटन, मिरवणूक व मंगळवारी असलेल्या प्रतासत्ताक दिनाचा ६६ वा वर्धापन दिन समारंभ म्हणजेच २६ जानेवारीच्या निमित्ताने तारपानृत्याची सांगड घातली जाणार आहे़ तसेच आदीविध ठिकाणी तारपानृत्य सादर करण्यास बोलविले जाते़ या नृत्यामध्ये हातात ढोलकाठी घेऊन एक म्होरक्या पुढे धावतो व त्याच्याबरोबरच साखळीने एकमेकांस घट्ट पकडून तारप्याच्या सुरावर बाकीचे नृत्य करतात़ यामध्ये तारपा वाजविणारा तारपकरी हा दम न सोडता श्वास रोखून धरून बराच वेळ वाजवितो़ (वार्ताहर)