राज्यात एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी ५ ते ६ तास लागता कामा नये - मुख्यमंत्री
By धीरज परब | Published: February 15, 2024 07:52 PM2024-02-15T19:52:49+5:302024-02-15T19:52:53+5:30
मीरा भाईंदर मधील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी बुधवारी रात्री मुख्यमंत्री शहरात आले होते.
मीरारोड- राज्याच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी ५ ते ६ तासांपेक्षा जास्त लागणार नाही असे रस्त्यांचे जाळे सरकार बनवत आहे. त्यासाठी अनेक रस्ते, पूल बांधून पूर्ण झाले असून अनेक योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शाळा आणि आरोग्य केंद्र आदर्शवत अशी मॉडेल बनवा असे ते म्हणाले.
मीरा भाईंदर मधील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी बुधवारी रात्री मुख्यमंत्री शहरात आले होते. भारतरत्न लता मंगेशकर नाटयगृहात बोलताना त्यांनी अनेक विकास योजनां बद्दल सांगितले . ग्रीनफिल्ड पद्धतीने पनवेल वरून गोव्याला ४ तासात पोहचता येईल, अटल सेतू मुळे २ तासांचा प्रवास १५ मिनिटांवर आला आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गा मुळे नागपूर ६ तासावर आले आहे. दहिसर वरून येणारा रस्ता हा भाईंदर व पुढे वसई - विरार वरून पालघर ते थेट डहाणूपर्यंत जाणार आहे . विरार-अलिबाग कॉरिडॉर चे काम सुरु आहे. आपले सरकार आल्या नंतर विकासकामे वेगाने सुरु झाली आहेत असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सार्वजनिक आरोग्य केंद्र अद्यावत करा. शाळा मॉडेल अश्या बनवा . सातारा जिल्हाधिकारी यांनी सुमारे ४०० शाळा व आरोग्य केंद्र कशी मॉडेल केली आहेत ते बघा . शाळा चांगल्या करा पण शाळांच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा चांगला व स्वच्छ ठेवा . मीरा भाईंदर मध्ये मेट्रोचे काम सुरु आहे . सूर्याचे पाणी येतेय , सिमेंट रस्ते होत आहेत . जुन्या इमारती व झोपडपट्ट्यांचा विकास साठी क्लस्टर मंजूर केले असून त्याचे प्रत्यक्ष काम सुरु करा . क्लस्टरसाठी अनेक वर्ष आम्ही आंदोलने केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले .
मीरा भाईंदर हे हे मुंबई - ठाण्याचा भार हलका करणारे मध्यवर्ती शहर आहे . शिवाय वेशीला लागून वसई विरार पण आहे . शहरात धूळ , डेब्रिज , घाण असता काम नये. ऑक्सिजन जास्त प्रमाणात देणाऱ्या बांबूच्या लागवडीसाठी भर दिला जात आहे . बांबू जास्त ऑक्सिजन देतेच पण त्याचा वापर सुद्धा वेगवेगळ्या कामासाठी होतो . झेंडे लावायला , अंतिमयात्रे वेळी बांबू लागतोच तसाच काही जणांना सुद्धा बांबू लावावा सुद्धा लागतो असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला .
डीप क्लीन ड्राइव्ह मुळे शहर अधिक स्वच्छ होत असून धूळ सुद्धा साफ होते . रस्ते धुण्यासाठी मलनिःसारण प्रकल्पाचे प्रक्रिया पाणी वापरा . पिण्याचे पाणी तर नाही ना वापरत ? असा सवाल पालिका आयुक्तां कडे पहात केला . मुंबईत सफाईकामगारांच्या ४८ वसाहत असून त्या स्वच्छ व चांगल्या ठेवण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले .
अधिकाऱ्यांनो कार्यालयात बसून नव्हे तर फिल्डवर काम करा
अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून नव्हे फिल्डवर काम करावे . कार्यालयात बसून रहाल तर प्रत्यक्ष बाहेरची वस्तुस्थिती समजणार नाही . अधिनस्त अधिकारी जे सांगतील तेवढेच कळेल . ग्राउंड रियालिटी महत्वाची आहे असे मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना जाहीर कार्यक्रमात सांगितले . फिल्डवर काम करणारे अधिकारी आवडतात . मुख्यमंत्री कधी रस्त्यावर पाणी मारायला गेला होता का ? पण मुख्यमंत्री आल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा फिल्डवर दिसते असे मुख्यमंत्री म्हणाले .