धावत्या ट्रेनमध्ये चढणं पडलं महागात, वृद्ध महिलेचा तोल गेला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 03:24 PM2021-09-21T15:24:05+5:302021-09-21T15:24:35+5:30
काळ आला होता पण वेळ आली नव्हती, वसई रोड स्टेशनवरील धक्कादायक घटना
वसई - धावत्या ट्रेनमध्ये चढणं एका वृद्ध महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. वसई रोड रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा चक्क तोल जाऊन ती ट्रेनच्या गेप मध्ये पडल्याने ती गंभीर जखमी झाली. ही थरारक घटना शनिवार 18 सप्टेंबर रोजी रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद होत, ती आता उघड झाली आहे. दरम्यान, ही वृद्ध महिला ट्रेनखाली जाणार इतक्यात पोलीस व इतर प्रवाशांच्या मदतीने या महिलेचे प्राण वाचवण्यात आले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस आणि प्रवाशांमुळं या वृद्ध महिलेला जीवनदान मिळाले आहे. मात्र, या अपघातात ती गंभीर रित्या जखमी झाली आहे. प्रमिला मारो ही महिला आपल्या पतीसोबत भावनगरहून हैदराबादला जात होती. त्यावेळी वसई रोड रेल्वे स्थानकात चहा घेण्यासाठी ट्रेन काही वेळ थांबली होती. त्यावेळी चहा पिण्यासाठी प्रमिला आपल्या पतीसह ट्रेनमधून खाली उतरल्या होत्या. मात्र, ट्रेन तात्काळ सुरू झाली. आपली ट्रेन सुटणार या भीतीने दोघंही प्लॅटफॉर्मवर ट्रेन पकडण्यासाठी धावू लागले. आणि धावती ट्रेन पकडण्याच्या सर्व गडबडीत त्या वृद्ध महिलेचा तोल गेला आणि ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामधील गेपमध्ये पडली.
महिला रेल्वे ट्रॅकवर पडल्यानंतर तिच्या पतीने व प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या प्रवाशांनी आरडा-ओरडा केला. प्रवाशांचा गोंधळी आवाज ऐकून रेल्वे पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत त्या महिलेला रेल्वे ट्रॅकमधून सुखरुप बाहेर काढलं आहे. पोलिसांच्या मदतीने या महिलेचे प्राण तर वाचले आहेत. मात्र, वृद्ध महिला गंभीररित्या जखमी झाली असून तिला नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. म्हणतात ना काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती, म्हणूनच दैव बलवत्तर असल्याने ही महिला बचावली.