ते १७ वर्षे ‘उघड्यावर’

By admin | Published: January 30, 2016 02:19 AM2016-01-30T02:19:41+5:302016-01-30T02:19:41+5:30

हगणदारीमुक्त पालघरचा नारा देणाऱ्या पालघर नगरपरिषदेला आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या १७ वर्षांत निवासस्थान तर सोडाच, प्रत्येकाच्या घरी शौचालयही उपलब्ध करून देता

It's 17 years 'open' | ते १७ वर्षे ‘उघड्यावर’

ते १७ वर्षे ‘उघड्यावर’

Next

पालघर/नंडोरे : हगणदारीमुक्त पालघरचा नारा देणाऱ्या पालघर नगरपरिषदेला आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या १७ वर्षांत निवासस्थान तर सोडाच, प्रत्येकाच्या घरी शौचालयही उपलब्ध करून देता आले नाही. नगरपरिषद हद्दीत महाविद्यालय मार्गावर गोठणपूर भागात नगरपरिषदेची सफाई कर्मचारी वसाहत आहे. पालघर ग्रामपंचायतीच्या काळापासून हे सफाई कर्मचारी या सेवेत आहेत. ही वसाहत गेल्या ४०-५० वर्षांपासून असून १९९८ मध्ये नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर परिणामी हे कर्मचारी नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी बनले. या वसाहतीत एकूण १८ खोल्या असून सुमारे १०० कर्मचारी येथे आपल्या पोराबाळांसह दाटीवाटीने राहतात. ग्रामपंचायत असताना बांधलेल्या या वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. भिंती पोकळ झाल्या आहेत, पत्रे तुटलेले आहेत, अंघोळीला मोरी व्यवस्थित नाही, अशा अवस्थेत हे सफाई कर्मचारी या वसाहतीत राहत आहेत. या सफाई कर्मचारी वसाहतीकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याचे चित्र येथे दिसत आहे.
या कर्मचारी वसाहतीला गेल्या अनेक वर्षांपासून शौचालयही नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. या वसाहतीमधील एका खोलीत संपूर्ण वसाहतीचे लाइट मीटर्स बसविलेले असून मीटर बॉक्स तारेवर टांगून ठेवले असून त्या खोलीतही एक कुटुंब राहत आहे. साहजिकच काही दुघर्टना घडली तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मोहंमद हुसेन खान यांनी या प्रकरणी नगरपरिषदेकडे पत्रव्यवहारही केला होता. परंतु, त्यांच्या या कैफियतीकडे लक्ष द्यायला कुणाला फुरसतही मिळालेली नाही. या प्रभागातून न. परिषद स्थापन झाल्यापासून अनेक नगरसेवक निवडून आले. पण, परिस्थिती जैसे थे आहे. पालघर न. परिषद स्थापन झाल्यापासून न.प.ने शहराच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. यंदा मात्र नगरपरिषदेने हगणदारीमुक्तीचा नारा दिला आहे.
पण, पालघर स्वच्छ करणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे चित्र दिसत आहे. या कर्मचारी वसाहतीची पडझड झाली असून पावसाळ्यात या खोल्यांमध्ये गुडघाभर पाणी शिरते. यामुळे घरातल्या सामानाची नासधूस तर होतेच, पण या पाणी भरलेल्या खोल्यांमध्ये राहणार कसे, हाही प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर भेडसावत आहे. येथे पिण्याच्या पाण्याचीही मारामारच आहे. एवढ्या खोल्यांना सार्वजनिक दोनच नळ दिलेले आहेत व नगरपरिषदेचे पाणी येते. ते फक्त दोन तास या व्यथा कर्मचाऱ्यांच्या असून या कर्मचाऱ्यांना वालीच नाही, असे चित्र स्पष्ट होत आहे. (वार्ताहर)

वसाहतीसमोर मोठे अंगण होते. अंगणात अनेक वर्षांपासून मंदिर बांधलेले होते. नगरपरिषदेने या ठिकाणी भले मोठे गटार बांधून मंदिरही तोडले, पण आमच्यासाठीच असलेल्या बोअरिंगही या गटारापायी तोडून टाकल्या. अनेक वर्षांपासून आम्ही नवरात्रोत्सव साजरा करतो. जागेअभावी आता तो कसा साजरा करावा, हाही प्रश्न पडतो आहे.
- मुकेश सोलंकी

आम्ही व आमचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून येथे राहत आहोत, पण ही अवस्था पाहता मुलाबाळांना घेऊन कसे राहणार, हा प्रश्न पडतो आहे.
- अजय रमण सोलंकी, कर्मचारी

माझ्या खोलीत असलेले मीटरचे बॉक्स तारेने तात्पुरते बांधले असून कधीही बॉक्स खाली पडून दुर्घटना घडू शकते. घरात म्हातारे माणूस राहत असून नेहमीच धास्ती असते. सर्व मीटरच्या वायरी खोलीवरून गेल्याने वजनाने पत्रेही पडू शकतात.
- मधू रामजी बारिया, कर्मचारी

घराची ही अवस्था बघता बारीकसारीक दुरुस्ती स्वखर्चाने करावी लागते. एवढ्या वर्षात बरेच जण पाहणी करून गेले, पण वसाहतीसाठी काहीच केले नाही.
- कुशाल वाघेला

Web Title: It's 17 years 'open'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.