डॉन को पकडना मुश्किलही नही, नामुमकीन है! आरोपीचा पोलिस अधिकाऱ्याला फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 09:05 AM2023-10-04T09:05:28+5:302023-10-04T09:05:47+5:30
पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घरच्यांनी तुळींज पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.
नालासोपारा : अमिताभ बच्चनच्या ‘डॉन’ चित्रपटात प्रसिद्ध असलेला ‘डॉन को पकडना मुश्किल नही, नामुमकीन है’ हा डायलॉग बलात्काराच्या आरोपीने चक्क तुळींजच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला व्हाॅटसॲप कॉल करून सुनावला. दरम्यान, तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्याच्या एक महिन्यानंतर ४५ वर्षीय आरोपी नराधमाला भाईंदरच्या उत्तन परिसरातून अटक केली आहे. धनंजय दुबे उर्फ जय दुबे (४५) असे या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घरच्यांनी तुळींज पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.
१५ वर्षीय पीडित मुलगी कामावरून लोकल ट्रेनने घरी जात होती. त्यावेळी तिच्या प्रियकराने फोन करून वाढदिवस असल्याचे सांगून ‘तू येऊन केक काप’, असे बोलला. नायगाव रेल्वेस्थानकावर उतरली. त्यानंतर तिचा प्रियकर आला. तिला मुंबई-अहमदाबाद हायवेवरील हॉटेलमध्ये घेऊन गेला. सर्व मित्र-मैत्रिणींनी मिळून केक कापला आणि एकत्र जेवण केले. सगळे आपापल्या घरी जाऊ लागले. यावेळी तिला प्रियकराने मित्राला त्याच्या कारमधून नालासोपारा येथे सोडण्यास सांगितले. आरोपीने पीडितेला कारमध्ये लिफ्ट देऊन निर्जनस्थळी नेत बलात्कार केला.
घटनेनंतर पीडितेने कसा तरी तेथून पळ काढला. या घटनेने घाबरलेल्या मुलीने घरी कोणालाही काहीही न सांगता ती घरातून बेपत्ता झाली. कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तुळींज पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी तपास सुरू केला.
‘ती’ घरातून का पळून गेली?
ही अल्पवयीन मुलगी तिच्या मूळ गावी राजस्थान येथे असल्याची माहिती मिळाल्यावर राजस्थानमधून मुलीला पोलिस ठाण्यात घेऊन आले. ती घरातून का पळून गेली याची चौकशी सुरू केली. मुलीने घडलेली हकीकत सांगितल्यावर ते ऐकून पोलिसही अवाक् झाले. आरोपीने तिला कारमध्ये जबरदस्तीने बसवत असताना तिने ऑटोमॅटिक ऑडिओ रेकॉर्डिंग केले होते. याच ऑडिओ रेकॉर्डिंग आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.