आमच्या गळ्यातील चेन मोडायची आलीय वेळ, कसले ‘ब्रेक द चेन’? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:33 PM2021-04-17T23:33:44+5:302021-04-17T23:33:53+5:30

छोट्या व्यावसायिकांचे धंदे झाले बंद  : गृहिणींची घर चालवताना कसरत

It's time to break the chain around our necks, what kind of 'break the chain'? | आमच्या गळ्यातील चेन मोडायची आलीय वेळ, कसले ‘ब्रेक द चेन’? 

आमच्या गळ्यातील चेन मोडायची आलीय वेळ, कसले ‘ब्रेक द चेन’? 

Next

- सुरेश काटे
लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अभियान सुरू आहे. मात्र, त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचे जगणे कठीण झाले आहे. गेले संपूर्ण वर्ष असेच गेल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वसामान्य गृहिणींप्रमाणेच व्यापारी- व्यावसायिकांच्या कुटुंबांनाही घर चालविताना अडचणी येत आहेत. गळ्यातील ‘चेन’ मोडायची वेळ आहे, कसले आले आहे ‘ब्रेक द चेन’? असा सवाल अनेकांकडून विचारला 
जात आहे.
गेले संपूर्ण वर्ष कोरोना प्रादुर्भावाच्या छायेत वावरत असताना, करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. व्यवसाय समाधानकारक झालेला नाहीच. मात्र, त्याचवेळी खर्च वाढलेला आहे. शासनाचे विविध कर भरताना व लाइट बिलासह अन्ये बिले भरताना नागरिकांच्या नाकीनऊ येत आहेत. अशा स्थितीत आम्हालाही आमचे घर चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याच्या तक्रारी अनेक व्यावसायिकांच्या घरांतून त्यांच्या पत्नींकडून होताना दिसत आहेत.

दोन महिनेच सुरू राहिला व्यवसाय, 
कर्ज कसे फेडायचे?
कोरोनामुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे बराच काळ व्यवसाय चालला नाही. मध्यंतरी कोरोना नियंत्रणात आल्यानंतर दुकाने, तसेच अन्य व्यवसाय बऱ्यापैकी सुरू झाले. सुमारे दोन महिने दुकाने- व्यवसाय सुरू झाल्यांतर पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून, संचारबंदी लागू झाली आहे. यामुळे आता कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकला आहे.

गेले वर्षभर कोरोनामुळे ब्युटीपार्लर व्यवसाय सुरुवातीला बंद आणि आता थोडा सुरू झाला असतानाच पुन्हा दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. पार्लरचे भाडे, बँकेचे हप्ते कसे फेडायचे? ब्रेक द चेन कसले? जगणे ब्रेक व्हायची वेळ आली आहे.
    -भावना प्रजापती, ब्युटीपार्लर व्यावसायिक, तलासरी
कपड्याचा व्यवसाय ठप्प झाला आहे. वर्ष कसेबसे काढले. पुन्हा ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली दुकाने बंद झाली आहेत. आता घरखर्च चालवायचा कसा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जाचा डोंगर वाढत आहे. जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
    - निमा अमरनाथ गुप्ता, 
    लेडीज गारमेंट, तलासरी

गेले वर्षभर कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय व्यवसाय ठप्प झालेले आहे. आता कुठे सावरू लागला असतानाच व्यवसाय बंदमुळे आवक बंद असताना खर्च मात्र कमी होत नाही. त्यात बंदचा फायदा उचलत अनेक वस्तूंचे भाव वाढविण्यात आले. त्यामुळे घरखर्च भागविणे कठीण झाले.
    - मृदुला राजगिरे, दापचरी

Web Title: It's time to break the chain around our necks, what kind of 'break the chain'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.