‘जय भवानी, जय शिवराय’.... शिवप्रेमींमध्ये जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:52 PM2020-02-19T23:52:36+5:302020-02-19T23:53:05+5:30
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शहरी, ग्रामीण भागात शिवजयंतीनिमित्ताने मिरवणुका काढण्यात आल्या
पालघर : ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात पालघर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात बुधवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाढवण बंदराच्या विरोधाचे पडसाद शिवजयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत उमटले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ गर्जनेने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. ठिकठिकाणच्या मिरवणुकीची सांगता दुपारी झाली.
पालघर : जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शहरी, ग्रामीण भागात शिवजयंतीनिमित्ताने मिरवणुका काढण्यात आल्या. शिवाजी महाराजांच्या पालख्या, महाराजांचा पेहराव केलेली अनेक लहान मुले घोड्यावर स्वार होऊन मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसून आले. पालघरमधील यंग ब्रिगेड ग्रुपच्यावतीने दुपारी पोलीस कॉलनीमधून ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
महाराजांची मूर्ती सजवलेल्या पालखीमधून नेण्यात आली. यावेळी पारंपरिक वेशभूषेत युवक, युवती, महिलांनी फेटे परिधान करून या मिरवणुकीत सहभाग नोंदवला. केळवे येथील हर्षल देव यांचे शिव व्याख्यानाचा कार्यक्र माचे आयोजन केले होते. तर डहाणू भागात मिरवणुकीत ‘एकच जिद्द,वाढवण रद्द’ या आशयाचे बॅनर झळकवून वाढवण बंदराला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला.
शिवजयंतीनिमित्ताने शहरात ठिकठिकाणी ढोलताशांचा आवाज घुमत होता. काही ठिकाणी मिरवणुका निघाल्या त्यातही चित्ररथ, वेशभूषा करुन मिरवणुका निघाल्या होत्या तर काही ठिकाणी बाईक रॅली काढण्यात आली होती. नाक्या - नाक्यावर चौकात केवळ छत्रपती शिवरायांचे पोवाडे ऐकायला मिळत होते. काही ठिकाणी बाईक रॅली मिरवणुका काढून राजेंना मानवंदना देत होते.
वसई पूर्व वालीव येथील ग्रेट मराठा या संस्थेने सालाबादप्रमाणे यंदा वालीव नाका येथे शिवजयंती साजरी केली. विद्यमान नगरसेवक प्रफुल पाटील यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सायंकाळी वसई फाटा ते वालीव अशी छत्रपतींची मिरवणूक काढण्यात आली. त्यात विविध चित्ररथांचे प्रदर्शन करण्यात आले होते. शहरातील नालासोपारा पूर्वेला मनसेने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात साजरी केली.
शिवप्रेमींनी वाढवण बंदरविरोधी भावना केल्या व्यक्त
डहाणूत सकल शिवप्रेमी मंडळाने विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून उत्सव साजरा केला. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर वाढवण गावात स्थानिकांनी मिरवणुकीतून बंदर विरोधी भावना व्यक्त केल्या.एस.टी. बस डेपो समोरील मैदानात कार्यक्र म आयोजित केला होता. सकाळी आठ वाजता महाराजांच्या मूर्ती पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर शिवभक्तांची बाईक आणि कार रॅली शहराच्या विविध भागातून फिरली तर सामाजिक उत्तरदायित्व म्हणून रक्तदान शिबिराचे उद्घाटन कॉटेज उपजिल्हा रु ग्णालयातील डॉ.अभिजित चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ५६ बाटल्या रक्त गोळा झाले.सायंकाळी शहरात मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये नागरिक पारंपरिक वेशात सामील झाले होते. घोषणा आणि पोवाडे यांनी वातावरण भारावले होते. ही मिरवणूक पारनाका येथील मैदानात पोहचल्यावर सभेत रूपांतर झाले. यावेळी पुण्यातील गणेश धालपे यांनी शिवविचारांवर व्याख्यान दिले तर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करण्यात आला.तालुक्यातील विविध भागात शिवप्रेमींनी मिरवणूक काढली तर चिखले गावात आदिवासी युवक मंडळाने शिवाजी महाराजांची प्रतिकृती रांगोळीतून काढली होती.
तलासरीत भव्य मिरवणूक
तलासरी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी तलासरीत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सकाळी श्रीराम मंदिरापासून या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. प्रथम शिवरायांच्या प्रतिमेला आणि मूर्तीला फुले वाहून शिवरायांच्या घोषणा देण्यात आल्या. वाहनावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती तर शिवरायांच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार झालेला तरु ण सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. भगवे फेटे घातलेले शिवभक्त, गावात लावण्यात आलेले भगवे झेंडे, यामुळे तलासरी परिसर भगवामय झाला होता. शाळकरी मुलींचे लेझीम पथक आणि नाशिक ढोल अग्रस्थानी होते. तलासरी श्रीराम मंदिरापासून निघालेली शिवजयंतीची मिरवणूक तलासरी नाकामार्गे सुतारपाडा गावातून फिरून तिची सांगता नाक्यावर झाली.