निबंधक कार्यालयातील ऑनलाइन दस्तनोंदणी ठप्प; खोदकामामुळे बीएसएनएलची केबल नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:40 AM2020-02-08T00:40:01+5:302020-02-08T00:40:50+5:30
आठ दिवसांपासून कामे रखडली
वसई : वसई तालुक्यातील सुयोग नगर येथील दुय्यम निबंधक वसई - १ या कार्यालयामधील इंटरनेट कनेक्टिव्हिटी वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. आठवड्याभरापासून बीएसएनएलच्या इंटरनेटअभावी येथील शेकडो खरेदी-विक्री व्यवहारांची दस्तनोंदणी होऊ शकत नसल्याची माहिती वसई - १ च्या दुय्यम निबंधक वर्ग २ च्या अधिकारी मंगला पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
नोंदणी आणि मुद्रांक विभागाने जमीन खरेदी-विक्री दस्तांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरु केली आहे. परंतु, ३१ जानेवारीपासून पापडी भाबोळा परिसरात पालिकेच्या खोदकामामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाला सेवा देणारी बीएसएनएलची मुख्य केबलच नादुरूस्त झाली असून पूर्ण सेवाच खोळंबली आणि याचा फटका दस्तनोंदणीला बसला आहे.
बीएसएनएलची कनेक्टिव्हीटी नसल्याने दस्त नोंदणी आणि त्याच्या स्कॅनिंगसाठी मोठी अडचण येत असते. गेल्या आठवड्यात पापडी भागात पालिकेने खोदकाम करून मोठाले खड्डे केले होते. त्यात ही बीएसएनएलची नेट केबलच नादुरुस्त झाली. त्यामुळे आठवडाभरापासून येथे कोणतीही दस्त नोंदणी झालेली नाही. आठ दिवसांपासून दस्त मिळावे यासाठी सकाळ -संध्याकाळ कार्यालयात हेलपाटे मारणारे नागरिकही यामुळे त्रस्त आहेत.
आठवडाभर दस्त नोंदणी झालीच नाही, अशी ही पहिलीच वेळ असल्याची प्रतिक्रिया येथील एका त्रस्त जेष्ठ नागरिकाने ‘लोकमत’ला दिली. पर्याय म्हणून बीएसएनएल तसेच नोंदणी आणि मुद्रांक विभागाने तातडीने लक्ष देऊन सर्व्हरशी कनेक्टिव्हिटी खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर सुयोग नगरस्थित दुय्यम निबंधकांनी बीएसएनएलकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानंतर आठवड्याभराने म्हणजेच गुरुवारी हे केबल दुरुस्तीचे काम बीएसएनएलने हाती घेतले आहे.
अजूनही दोन दिवस हे काम सुरू राहील, अशी माहिती मिळते आहे. त्यानंतरच हे दस्त नोंदणी आणि स्कॅनिंगचे काम सुरळीत होईल, अशी चिन्हे आहेत.याबाबत नवघरस्थित महापालिकेच्या पाणी विभागाचे नियंत्रक केतन राऊत यांनी सांगितले की, आम्ही तीन दिवस खड्डे रिकामे ठेवले होते. मात्र, बीएसएनएलने काम केलेच नाही, त्यामुळे आपण त्यांच्याकडे विचारणा करावी.
नेट कनेक्टिव्हिटी आणि नादुरूस्त केबलमुळे आठवडाभरापासून आॅनलाइन दस्त ठप्प आहेत. दररोज साधारण ३० दस्त होतात. आता खोदकामामुळे नेट ठप्प आहे आणि महसूलही बुडतो आहे. आम्ही बीएसएनएलकडे तक्रार केली असून त्यांचे काम सुरू आहे. हे नेट सुरळीत होण्यास अजूनही एखादा दिवस जाईल. यामुळे नागरिकांना त्रास आणि कार्यालयाचेही काम वाढते आहे.
- मंगला पवार, वसई -१ दुय्यम निबंधक वर्ग -२, सुयोग नगर कार्यालय