जव्हारचा शाही दरबारी दसरा प्रचंड उत्साहात साजरा
By admin | Published: October 23, 2015 12:09 AM2015-10-23T00:09:56+5:302015-10-23T00:09:56+5:30
भूतपूर्व संस्थानाची पार्श्वभूमी असलेल्या जव्हारचा दरबारी आणि ऐतिहासिक दसरा मोठ्या धामधुमीत साजरा होतो. आजच्या जव्हारमध्ये शिल्लक राहिलेल्या संस्थानकालीन
- हुसेन मेमन, जव्हार
भूतपूर्व संस्थानाची पार्श्वभूमी असलेल्या जव्हारचा दरबारी आणि ऐतिहासिक दसरा मोठ्या धामधुमीत साजरा होतो. आजच्या जव्हारमध्ये शिल्लक राहिलेल्या संस्थानकालीन खुणांपैकी प्रामुख्याने उल्लेख करावयाचा झाला तर या दरबारी दसऱ्याचा उल्लेख नक्कीच अभिमानाने करता येईल. सुमारे ६०० वर्षे परंपरेने चालत आलेला जव्हारचा दसरा हा जव्हारकर नागरिकांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.
जव्हारचा हा दरबारी, वैभवशाली दसरा संस्थाने विलीनीकरणानंतर त्या पद्धतीने साजरा होत नसला तरी नगरपालिकेमार्फत एक सांस्कृतिक परंपरा जोपासण्याच्या प्रयत्नातून दसरा गतकाळच्या स्मृती जागवत असतो. आजही तितक्याच मोठ्या उत्साहाने दसरा साजरा होतो. पूर्वी श्रीमंत राजेसाहेबांची मिरवणूक, पालखीची मिरवणूक निघत असे. आता त्याऐवजी अंबिकामातेचा चित्ररथ पालिकेतर्फे काढला जातो. जुना राजवाडा येथून हनुमान पॉइंटपर्यंत मोठी मिरवणूक निघते. हजारोंच्या संख्येने परिसरातील आदिवासी जनता येते. रात्रभर तारपा नृत्य व ढोल वादनावर बेभान होऊन नृत्याचा कार्यक्रम होतो. हा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी लांबलांबहून लोक येत असतात. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालिकेमार्फत कुस्त्या आयोजित केल्या जातात. नाशिक, घोटी, नगर, पुणे जिल्ह्यांतील नामवंत मल्ल येत असतात. जव्हारचा दसरा हा एक सांस्कृतिक सोहळा म्हणून साजरा होत असतो. नागरिकांसमवेत मिरवणुकीने सीमोल्लंघनासाठी नगराध्यक्ष हनुमान पॉइंटवर जातात. शमीपूजन होताच तेथे सोने लुटले जाते. रावणाच्या प्रतिमेचे दहन होते.