जव्हारचा शुभम मदने बनला उपजिल्हाधिकारी, तर कल्पेश जाधव तहसीलदार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 09:24 PM2020-06-21T21:24:41+5:302020-06-21T21:25:54+5:30
हे दोन्ही विद्यार्थी जव्हार सारख्या आदिवासी दुर्गम भागातुन शिक्षण घेऊन त्यांनी यश संपादन केले आहे.
- हुसेन मेमन
जव्हार : महाराष्ट्र लोकसेवा अयोगातर्फे (एमपीएससी)घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या अंतिम निकाल नुकताच लागला असून पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी जव्हार तालुक्यातील दोन विद्यार्थी शुभम मदने (राज्यात प्रथम अनुसूचित जमाती प्रवर्गातून) यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली तर वाळवंडा गावातील खडकीपाडा येथील कल्पेश चंदर जाधव (राज्यात दुसरा अनुसुचित जमाती प्रवर्गातून) यांची तहसीलदार या उच्चदर्जा पदी निवड झाली. त्यांच्यावर कौतुक होत असून शुभेच्छाचे वर्षांव होत आहेत.
हे दोन्ही विद्यार्थी खूप हुशार आणि मेहनती असून त्यांनी खूप मोठे यश संपादन केले असून त्यामुळे जव्हार तालुक्यातुन त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत असुन, सोशल मीडियावर सध्या त्यांचीच चर्चा आहे. हे दोन्ही विद्यार्थी जव्हार सारख्या आदिवासी दुर्गम भागातुन शिक्षण घेऊन त्यांनी यश संपादन केले आहे. जव्हार, मोखाडा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील शुभम मदने यांचे वडील एसटी महामंडळात मेकॅनिकलचे काम करतात. आई गृहिणी तर वडिलांचे उच्चशिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. वडिलांनी पैशांचा कुठलाही विचार न करता आमच्या शिक्षणासाठी लागेल तो खर्च केला. वडिलांचे शिक्षण कमी असल्याने शिक्षणाविषयी इच्छा अपूर्ण राहिल्याने मनात खंत राहिली होती. ती पूर्ण करण्यासाठी मी सलग अठरा तास अभ्यास करून हे यश मिळवले. गेल्या तीन वर्षांपासून "यूपीएससी'चा अभ्यास करतानाच राज्यसेवा आयोगाच्या परिक्षेचा अर्ज देखील केला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्याने यशाला कवेत घेतले. वडिलांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद हीच माझी "फादर्स डे'निमित्त वडिलांना भेट असल्याचे शुभम म्हणाला.
दरम्यान, शुभमच्या यशाची बातमी मिळताच शहरातील मंडळी नातेवाईक आदी शुभमला भेटण्यासाठी घरी गर्दी केली होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप तेंडुलकर यांनी घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. तसेच, कल्पेश जाधव हे जव्हार तालुक्यातील वाळवंडा खडकीपाडा येथील असून त्याचे आई वडील निरक्षर असून सुद्धा जिद्दीच्या जोरावर त्यांनी वयाच्या २१व्या वर्षी राज्य सेवा परीक्षेत यश संपादन करून पहिल्या प्रयत्नात सहाय्यक आयुक्त कोशल्य विकास अधिकारी म्हणून निवड झाली होती व त्यानंतर त्यांनी पुन्हा राज्य सेवा परीक्षेत तहसीलदार पदी निवड झाली अश्या कल्पेश जाधव ज्या गावात राहतो तिथे जाण्यासाठी रस्त्याची सुध्दा सोय नाही तसेच त्यांनी आदिवासी वसतिगृहात राहून स्वतः अभ्यास करून हे यश संपादन केले आहे त्याबद्दल त्याचा आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद झाला आहे.
आयोगातर्फे दिनांक १३ते १५जुलै २०१९ रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती एकूण ४२० पदांसाठी देण्यात आलेल्या मुख्य परीक्षेतचा अंतिम निकाल आयोगामार्फत काल जाहीर केला सविस्तर निकाल प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (कट-ऑफ)आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पालघर जिल्हा ग्रामीण आदिवासी जिल्हा म्हणून उदयास आला असून आता ग्रामीण भागातील विद्यार्थी या मार्गाचा प्रशासकीय सेवा स्पर्धा परीक्षा अवलंब करीत पुढे जात असल्याने मला खूप आनंद वाटत असून गर्व वाटत आहे, अजूनही स्पर्धक तयार होऊन अधिकाधिक अधिकारी तयार व्हावेत यासाठी आम्ही मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ.
- सुनील भुसारा, आमदार (विक्रमगड विधानसभा)
नियमितपणे अभ्यास सुरू असल्यामुळे पहिल्याच प्रयत्नात उपजिल्हाधिकारी बनलो आहे. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवकांनी कितीही अपयश आले तरी भरकटून जाऊ नये. सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आपले ध्येय निश्चित करावे. इतरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत यशस्वी व्हावे.
- शुभम मदने, उपजिल्हाधिकारी.