जव्हारला ५६५ वा उरूस थाटात साजरा, पालघर जिल्हाधिका-यांनी घेतला आशीर्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 05:36 AM2017-09-14T05:36:36+5:302017-09-14T05:36:46+5:30
- हुसेन मेमन
जव्हार: शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या हजरत औलिया शाह सदरोद्दीन्न बदरोद्दिन हुसैनी चिश्ती (र.अ.) यांचा उरूस सोमवार, मंगळवार व बुधवार असा तीन दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
दुसºया दिवशी चादर कार्यक्रमात पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे व प्रांत अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पवनीत कौर यांनीही यावेळी हजेरी लावून बाबांना फुले अर्पण करून आशीर्वाद घेतला. तसेच यावेळी उर्स जल्सा व सुन्नी मुस्लिम कमेटी कडून या दोन्ही मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सर्वधर्मीय लोक यावेळी सहभागी झाले होते. फुलांच्या चादरी अर्पण केल्या गेल्या. त्यानंतर उरुस कमेटी तर्फे लंगर चे आयोजन करण्यात आले होते यात हिंदु-मुस्लिम बांधवांकरीता पूर्ण गावाला व पाहुण्यांना भोजन दिले गेले, या कार्यक्रमानंतर पहाटे पर्यत चालणारा बहारदार कव्वालीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार
पडला.
त्यास लाखो चाहत्यांनी हजेरी होती. यात हाजी मजीद शोला या नामी कव्वाल ने देशभक्तीवर कव्वाली गायली त्यावेळी जव्हारमध्ये हिंदु- मुस्लिम दोन्ही समाजातील चाहत्यांनी मोठा जल्लोष केला होता.
खास करून या रात्री जव्हार बसस्थानकातही सकाळ पर्यत जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. जव्हार व परिसरांतील असंख्य मान्यवर मंडळी व आदिवासी बांधवही मोठ्या संख्येने कव्वालीच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.
तिसºया दिवशी म्हणजे नवमीस सायंकाळी ख्वाजापिर यांच्या संदल वाटपाच्या व झेंडा फलक कार्यक्रमास राजे महेंद्रसिंग मुकणे उपस्थितीत होते. असा हा हजरत औलिया पीर शाह सदरोद्दिन बदरोद्दिन चिश्ती (र.अ.) यांचा उरूस दरवर्षी प्रमाणे यंदाही हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोप्याने साजरा केला.
दरवर्षीप्रमाणे पूर्ण गाव तसेच एस. टी. स्टॅन्डजवळील परिसर गजबजलेला आहे. आकाशपाळणे, वेगवेगळे खेळ, मौत का कुआ प्रदर्शने, विविध प्रकारचे स्टॉल्स, खेळण्यांची दुकाने मोठ्या संख्येने लागलेली आहेत. बरीचशी मंडळी बाहेरगांवाहून खास या उरूसासाठी आली होती. हा शाही उरूस म्हणजे जव्हारच्या इतिहासातले एक महत्वाचे पान आहे. राजेशाही नसली तरी आजही ही परंपरा हिंदू मुस्लिमबांधव एकोप्याने पाळत असल्यामुळेच जव्हारच्या उरूसला एक आगळी वेगळी शान आहे. या महोत्सवात पोलिसांचाही चौख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी सुरेश घाडगे यांनी त्याचे नियोजन करून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घेतली होती. तसेच जव्हारचे पोलिस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी चोख बंदोबस्त ठेवला
होता.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी ऊर्स जल्सा कमेटीचे अध्यक्ष अलताफ शेख, उपाध्यक्ष शकील शेख व जहीर (बबला) शेख, सेक्रेटरी ईर्शाद शेख, कॅशीयर अब्दुल हमीद शेख व फिरोज खान तसेच उर्स जल्सा कमेटीचे सर्व सदस्य व सुन्नी मुस्लिम जामा मशिदीचे सर्व पदाधिकारी व सदस्य आदिंनी खुप मेहनत घेतली. नगरपालिकेने या वेळी सर्व व्यवस्था चोख ठेवल्यामुळे शहरवासियांमध्ये समाधान व्यक्त होत होते. एसटीनेही सोडलेल्या जादा बसेसबाबत असेच समाधान व्यक्त होत होते.
उरुसाच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरले रतिफ
उरूसाच्या पहिल्या दिवशी जामा मशिदीतून येथून भव्य मिरवणूक निघाली, पाचबत्तीनाका व नेहरूचौकातून पुन्हा दर्ग्याकडे येऊन पवित्र संदल व फिरनी वाटप करण्यात आली. या महोत्सवात दुसरा दिवस महत्वाचा मानला जातो. भव्य चादरीची जामा मशिदीपासून मोठ्या उत्साहात मिरवणूक निघाली.
या मध्ये मुरीद व फकीर यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यावेळी ठिकठिकाणी चौकात रातिफ करण्यात आला. मुरीद व फकीर यांनी तलवार, खंजीरचे वार आपल्या आंगावर करणे, सळई वा जाड तारा खुपसणे या सारखे थरारक प्रकार यावेळी केले.
मात्र, औलिया पीर रिफाई परंपरेच्या करामतीमुळे रक्ताचा एकही थेंब निघाला नाही, हे यांचे वैशिष्ट्य. हा रातिफचा सोहळा ढोल ताशे, नगारे यांच्या वादनात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पाचबत्तीनाका, नेहरूचौक, व त्यानंतर गांधीचौक व परत दर्गाह असा हा मार्ग असतो.
हजरत औलिया शाह सदरोद्दीन बदरोद्दिन चिश्ती (र.अ.) यांच्या दर्ग्यावर सन्मानपूर्वक चादर चढविण्यात आली.
यंदाच्या उरूसात येणाºया पाहुण्यांना व गावकºयांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून, या तीन्ही दिवसात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात आली, तिला हिंदु-मुस्लिमबांधवांनी सहकार्य केले, तसेच पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही, सर्व नियोजित कार्यक्रम सुरळीत पार पडले. उरुस जल्सा कमेटीच्या व सुन्नी मुस्लीम कमेटीच्या सदस्यांच्या सहकार्याने हा उरुस हिंदु-मुस्लिमांनी एकोप्याने साजरा केला. -अलताफ शेख, अध्यक्ष उर्स जलसा कमेटी, जव्हार