जव्हार - चोथ्याचीवाडी रस्ता तुटला; ३५ गावपाड्यांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:25 PM2019-08-05T23:25:33+5:302019-08-05T23:25:40+5:30
दरड कोसळून पूर्ण रस्ताच गेला वाहून
जव्हार : आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू असून रविवारी संध्याकाळी जव्हार शहरातील पर्यटनस्थळ असलेल्या हनुमान पॉईंटच्या खाली चोथ्याची वाडीजवळ दरड कोसळून पूर्ण रस्ताच वाहून गेल्याची घटना घडली. यामुळे ३५ गावपाड्यांचा संपर्क तुटला आहे. तर सेलवास - जव्हार बायपास मार्गाला देखील मोठा तडा जावून संपूर्ण रस्ता तुटला आहे. त्यामुळे जव्हार बायपास रोड बंद करून जव्हार शहरातून वाहतूक वळवण्यात आली आहे. दरम्यान, एका वाहन चालकाने वाहन या मार्गावरुन नेले. आणि या खचलेल्या रस्त्यावर ते उलटले. सुदैवाने जीवित हानी टळली आहे. जव्हार शहराला लागून असलेल्या हनुमान पॉर्इंटच्या खाली नागमोडी वळणावर चोथ्याच्यावाडी गावाजवळ रस्ता तुटला असून यामुळे जवळ जवळ २० ते २५ फूट खड्डा पडला आहे. झाप, साकूर, दोन्ही मार्ग बंद झाले असून, साकूर - रामखिंड मार्गे जाणारा वाडा - ठाणे मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे या झाप साकूर भागातील ३५ गावंपाड्यांचा संपर्क तुटला आहे. झाप, साकूर या दोन्ही रोड परिसरात साकूर आणि झाप असा दोन आश्रम शाळा आहेत. तर साकूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, झाप येथे आरोग्य उपकेंद्र आहे. मात्र, या भागाकडे जाणारा रस्ताच बंद झाल्याने रुग्णांचे मोठे हाल झाले आहेत. तसेच या परिसरातील जव्हार येथे शाळा, कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी अडचण झाली आहे. याबाबत प्रशासनने लवकरात लवकर रस्ता तयार करून मार्ग सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नरेंद्र मुकणे यानी केली आहे. जव्हार - सेलवास मुख्य रस्ता असून येथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये - जा करतात. रस्ता बंद केल्याने ही वाहतूक शहरातून वळवली आहे.