जव्हारच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतील का ?
By admin | Published: May 8, 2016 02:53 AM2016-05-08T02:53:31+5:302016-05-08T02:53:31+5:30
शासननियमाप्रमाणे दर वर्षी मे मध्ये ज्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची एकाच ठिकाणची तीन वर्षांची सेवा पूर्ण झालेली असते त्यांची बदली व्हावी, असा दंडक असतांना जव्हारमध्ये
जव्हार : शासननियमाप्रमाणे दर वर्षी मे मध्ये ज्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची एकाच ठिकाणची तीन वर्षांची सेवा पूर्ण झालेली असते त्यांची बदली व्हावी, असा दंडक असतांना जव्हारमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अधिकारी तथा कर्मचारी एकाच ठिकाणी संबंधित टेबलचा कार्यभार सांभाळत आहे. जिल्ह्यातील विविध कार्यालयातील विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी अशा स्वरुपात बदल्या केल्या जातात, मात्र जव्हार त्याला अपवाद आहे काय? कारण जव्हारमधील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याच होत नाहीत. ते वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून बसलेले आहेत.
जव्हार तालुका हा ९९ टक्के आदिवासी तालुका असल्यामुळे येथील बराचसा आदिवासी बांधव अशिक्षित आहे, त्यामुळे त्याला नियमांची जाण नाही, परंतु काही सामाजिक कार्याकर्त्यांच्या माहिती नुसार विशिष्ट विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानीने कामे रेंगाळली जातात, याचा फटका येथील गरीब आदिवासी जनतेला बसत आहे.(वार्ताहर)
बदल्या करून त्या रद्द करून घेण्याच्या प्रकारातही दरवर्षी मे महिन्यात वरीष्ठ कार्यालयात मोठ्या प्रमाणात अर्थकारणाची धावपळ सुरू असते.
तीन वर्ष पूर्ण झालेले अधिकारी व कर्मचारी परत तेच कार्यालय मिळण्याकरीता मंत्रालयापासून तर वरीष्ठ कार्यालयात सेटींग लावून बदलीला स्थगिती मिळवून अथवा ती रद्द करून पुन्हा आपल्या जुन्या खुर्चीवर विराजमान होतात.
ज्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तीन वर्ष पूर्ण झालेले असतील त्यांची बदली दुसऱ्या कार्यालयात शासन निर्णयाप्रमाणे करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अलताफ शेख यांनी केली आहे.