जव्हार प्रतिष्ठान व भाजपाची युती, जव्हारच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 03:12 AM2017-11-22T03:12:39+5:302017-11-22T03:12:45+5:30
जव्हार नगर परिषदेची सार्वत्रीक निवडणूक सुरू असून युती-आघाडी, पक्षा पक्षातील मनोमिलन तर कुठे नाराजी अशा वातावरणात जव्हार प्रतिष्ठान व भाजपाने युती केलेली आहे.
जव्हार : जव्हार नगर परिषदेची सार्वत्रीक निवडणूक सुरू असून युती-आघाडी, पक्षा पक्षातील मनोमिलन तर कुठे नाराजी अशा वातावरणात जव्हार प्रतिष्ठान व भाजपाने युती केलेली आहे. जव्हार प्रतिष्ठानचे नगराध्यक्ष व ११ नगरसेवक तर भाजपाचे ६ नगरसेवक अशी १७ उमेदवारांची जुळवणी करून सोमवारी ही युती जाहीर करण्यात आली. यावेळी जव्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष हरीशचंद्र भोये, सचिन सटाणेकर, कुणाल उदावंत, बबला शेख, ईमरान लुलानिया, मंगल वाघ, नगरसेवक गिरीष मुकणे आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
जव्हारच्या विकासाकरीता प्रयत्नशील असलेल्या जव्हार प्रतीष्ठानला भाजपाची साथ मिळाल्यामुळे त्यांचे पाठबळ अधिक झाले असून जव्हारच्या विकासाच्या दृष्टीने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या निवडणूकीत जोर लावणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. जव्हारच्या विकासाला सत्ताधाºयांच्या वादामुळे खिळ बसली होती, मात्र यंदा आमची सत्ता आल्यावर विकास झपाटयाने घडवू असे आश्वासन युतीने दिले.
राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयाची व तरतुदीची मागणी वरीष्ठांकडून तातडीने मंजूर
करून आणू, तसेच जव्हार
नगर परिषदेनेही याच वर्षी १०० व्या वर्षात पदार्पण केल आहे. असे
भाग्य लाभलेली ती एकमेव नगर परिषद आहे, त्यामुळे आम्ही पर्यटन विकास, पाणी समस्या, रस्ते आदि महत्वाच्या समस्या सोडविण्याकरीता १०० व्या वर्षात एकूण १०० कोटीचा निधी मंजूर करून आणू व जव्हारकरांच्या अनेक समस्या कायमच्या दूर करू, असे भरत
पाटील यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
> भाजपा समवेत युती केल्याने आमची सत्ता आल्यावर आम्हाला चांगला निधी आणता येईल व आदिवासी विकास मंत्रीही येथीलच असल्यामुळे विकासावर भर देता येईल
-हरीश्चंद्र भोये, प्रदेश उपाध्यक्ष
आम्ही गेल्या काही वर्षापासून जव्हारच्या विकासाच्या दृष्टीने लढत आलो आहे. तसेच काही महिन्यापूर्वी झालेल्या पोट निवडणूकीत आम्हाला १०० टक्के यश प्राप्त झालेले आहे. मतदारांचे कल आमच्याच बाजूने आहे,
-भरत पाटील, जव्हार प्रतिष्ठान