जव्हारमध्ये नदी-नाले तुडुंब
By Admin | Published: July 2, 2017 05:33 AM2017-07-02T05:33:46+5:302017-07-02T05:33:46+5:30
: शुक्रवारपासून धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी पाणीच पाणी असल्याचे दृष्य असून संपूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : शुक्रवारपासून धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी पाणीच पाणी असल्याचे दृष्य असून संपूर्ण तालुका जलमय झाला आहे.
दुसरीकडे धबधबे, नद्या व नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. शहरात शुक्रवारी ६७ मि. मी. पावसांची नोंद करण्यात आली असून ३० जून पर्यत ७३७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली असल्याची माहीती अपतकालीन विभागाच्या माया येवले यांनी लोकमतला दिली.
जव्हार हे समुद्र सपाटी पासुन १८०० ते २००० फूट उंचीवर असल्यामुळे येथे कितीही पाऊस पडला तरी त्याचे पाणी वाहून जाते. त्यामुळे या भागात कुठेच पाणी भरलेले दिसून येत नाही, मात्र खेडोपाड्यावर डोगर दऱ्यांच्या मधील सखल मार्गावरील कमी उंचीच्या मोऱ्यांवरून पावसाचे अथवा पूराचे पाणी वाहू लागल्याने खेडोपाड्यातील बांधवांचा संपर्क तुटतो. त्यांना ते पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागते. यामुळे खेडोपाड्यातील रूग्णांचे मोठे हाल होत आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुऱ्या सुविधांमुळे रूग्णांना जव्हारच्या कुटीर रूग्णालयात यावे लागते, आणि उपचार करावे लागते तसेच गरोदर स्त्रियांचे उपचार हे जव्हार कुटीर रूग्णालयात होत असल्यामुळे त्यांनाही जव्हारला येऊन उपचार घ्यावा लागतो, अशी परिस्थिती आहे. जूनचा पूर्वाध पूर्ण कोरडा गेल्यामुळे पावसासाठी प्रार्थना करव्या लागल्या. पाऊस पडू दे ! मात्र जून अखेरीस पाऊस इतका सुरू झाला की, शेतकऱ्यांच्या पेरण्याही वाहून गेल्या आहेत, त्यामुळे आता थांब रे बाबा म्हणावे लागते आहे.
जव्हार, विक्रमगडचा संपर्क काही काळ खंडीत
जव्हार-विक्रमगड मुख्य रस्त्यावर असलेल्या आणि सतत वादात असल्याने अपूर्ण राहिलेल्या साखरे गावातील पाचमाड पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जव्हार ते विक्रमगड जाण्याचा मार्ग अनेक तास बंद होता, पाणी कमी झाले की मोठी वाहने धोका पत्करून पूल पार करीत आहेत. परंतु छोट्या वाहनांना मात्र तासंतास ताटकळत पाणी कमी होण्याची वाट पहावी लागत आहे.