जव्हार तालुक्यातील जनतेला तलाठ्यांच्या मनमानीची ‘सजा’
By admin | Published: April 10, 2017 05:17 AM2017-04-10T05:17:21+5:302017-04-10T05:17:21+5:30
तालुक्यातील १३ तलाठी सजा आहेत. मात्र त्या संंबंधित गावांत कार्यान्वित नाहीत. त्यामुळे तालुक्यातील तलाठी
हुसेन मेमन /जव्हार
तालुक्यातील १३ तलाठी सजा आहेत. मात्र त्या संंबंधित गावांत कार्यान्वित नाहीत. त्यामुळे तालुक्यातील तलाठी सजांच्या कार्यालयाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. तोपर्यंत नागरिकांना त्याची सजा भोगावी लागत आहे.
जामसर, वावर, देहेरे, कोगदा, मेढा, तलासरी, विनवळ या सात तलाठी सजा साखरशेत मंडळ अधिकारी १ मध्ये मोडीत आहेत. तर जव्हार, वाळवंडा, कौलाळे, डेंगाचीमेट, न्याहाळे, पाथर्डी, या सहा तलाठी सजा जव्हार मंडळ अधिकारी २ मध्ये येत असून जव्हार तालुक्यातील १३ तलाठी सजा आहेत. मात्र या सजांचे तलाठी कार्यालयात बसतच नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांना विविध कामांसाठी त्यांची शोधाशोध करावी लागते आहे.
आदिवासी नागरिक रोज विविध कामांसाठी तलाठ्यांकडे येत आहेत. यामध्ये सातबारा काढणे, नावे लावणे, जातीचा व उत्पन्न दाखला काढणे, ७ बा-याला वारस लावणे, शेतकर्यांच्या विविध नोंदी ठेवणे, दाखल्यांचा पंचनामा करणे, याकामांचा समावेश असतो. मात्र तलाठीच जागी नसल्याने नागरिकांना नाहक भुर्दंड बसतो आहे. लहान कामासाठीही तलाठी भेटत नसल्याने नागरिकांना जव्हारच्या चावडीवर धाव घ्यावी लागते. परंतु त्याही ठिकाणी तलाठी भेटत नाही. लहान-मोठ्या कामांसाठी अनेक फे-या माराव्या लागत आहेत. त्यामुळे आदिवासी नागरिकांना तलाठ्यांमुळे सजा मिळत आहे.
जव्हार तालुक्यातील तलाठ्यांनी आपले कार्यालय घरीच थाटल्याने नागरिकांना तलाठ्यांच्या घराकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यानंतरही नागरिकांची कामे व्यवस्थित व वेळेत होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तलाठी कर्मचारी सजा कार्यालयात बसत नसल्याने त्यांची अवस्था दयनिय आहे. दरवाजे, खिडक्या मोडकळीस, उंदीर, घुशींचा वावर, अशा स्थिती तेथे दप्तर ठेवावे तरी कसे? असा प्रश्न आहे. सजेतील प्रत्येक तलाठ्यांने आपल्या सोयीनुसार वार ठरवून दिले आहेत. मात्र या वारालाही हे तलाठी उपस्थित राहत नाही. त्यामुळे नागरिकांना दिवसभर थांबूनही रिकाम्या हाताने परतावे लागते आहे.
(वार्ताहर)