जव्हार: राष्ट्रवादीचा भरपाईसाठी ठिय्या
By admin | Published: May 28, 2016 02:18 AM2016-05-28T02:18:16+5:302016-05-28T02:18:16+5:30
तालुक्यातील राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिवनेरी गार्डन धाब्यासमोर गुरुवारी सकाळी ८.०० वा. पासून रास्ता रोका करण्यात आला.
जव्हार : तालुक्यातील राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिवनेरी गार्डन धाब्यासमोर गुरुवारी सकाळी ८.०० वा. पासून रास्ता रोका करण्यात आला.
दि.७ जून २०१५ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांची भरपाई आतापर्यंत मिळालेली नसून दिनांक १० मे २०१६ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे तत्काळ करुन नुकसानभरपाई मिळण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला होता. या रास्ता रोकोत तालुका अध्यक्ष कमळाकर धूम, नगराध्यक्ष संदीप वैद्य, माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, जिल्हा सरचिटणीस बळवंत गावित, यशवंत भोये, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सोऐब लुलानिया, दयानंद लहारे तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यात ७ जून, २०१५ रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे हाताशी आलेले आंब्याचे पीक वाया गेले होते. त्या वेळी शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या वादळामध्ये शेकडो घरेही उद्ध्वस्त झाली होती. त्या वेळी नुकसानीचे पंचनामेही झाले होते.
परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत नुकसानभरपाई पोहोचलीच नाही. तेव्हा दि.१४ सप्टेंबर २०१५ रोजी शासनाला जाग यावी, याकरिता पक्षाच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले होते. त्या वेळी काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. मात्र अजूनही १ वर्ष उलटून गेले असले तरी ही उर्वरित २२४७ शेतकऱ्यांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही.
याबाबत राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी यांना उपोषणाचे लेखी पत्र दिले असता त्यांनी दि.२२ फेब्रुवारी २०१६ रोजी लेखी आश्वासन दिले होते. मात्र आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही.
यावर्षीही दि.१० मे २०१६ रोजी तालुक्यात वादळी वाऱ्यांचा पाऊस पडला. यामध्ये आंबा, काजू, केळी, घरांचे व शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.