CoronaVirus News : जव्हार बाजारपेठ पाच दिवसानंतर पुन्हा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:37 AM2020-06-21T00:37:57+5:302020-06-21T00:38:25+5:30
रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेले असतानाही नियम मोडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
जव्हार : जव्हार शहरात मागील आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आणि एकच खळबळ उडाली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ‘एकता’ कर्फ्यू लागू करून १५ ते १९ जूनदरम्यान सलग पाच दिवस शहर बंद करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेले असतानाही नियम मोडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
शहरात वाढलेला आलेख बघता पुन्हा शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती व व्यापारी मंडळींनी एकत्र बैठक आयोजित करून शहरात आस्थापना उघडतील, मात्र काळजीपूर्वक ग्राहकांना माल देणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, अशा विविध बाबींवर खूप वेळ चर्चा करण्यात आली आणि शनिवारपासून आस्थापना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू राहतील, असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शहरात शुक्रवारी व शनिवारी दुपारपर्यंत संशयित रुग्णांचे अहवाल अप्राप्त असल्यामुळे मागील दोन दिवसांपासून नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ नसल्याची बातमी असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, शहरातील रुग्णांची वाढती संख्या बघता नगर परिषद तथा आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिक सतर्क झाले असून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, नागरिक नियम मोडत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. नगर परिषद हद्दीतील घाग चाळ येथे एक रुग्ण सापडल्यामुळे ते प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. मात्र, तेथे राहणारे रूपेश घाग हे वारंवार नियम मोडीत दुकान उघडून बसत होते, बाहेर येत होते. म्हणून जव्हार पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, जो कोणी नियम मोडेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी दिला आहे.