भाईंदरच्या जोशी रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात, महापालिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 02:53 PM2020-01-02T14:53:34+5:302020-01-02T15:02:26+5:30
शहरातील सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात चांगली वैद्यकिय सेवा मिळावी
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या व सद्या शासना कडे तीन महिन्यासाठी नियोजन दिलेल्या भाईंदरच्या पंडित भिमसेन जोशी रुग्णालयाचेच आरोग्य बिघडलेले आहे. विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या या रुग्णालयातील स्वच्छतागृहाच्या पाईपातुन सांडपाणे वहात असुन ते पिण्याच्या पाण्याच्या टाकी जवळ साचले आहे. सदर टाकी देखील उघडी असुन सांडपाणी व दुर्गंधी मुळे रुग्णांसह कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात चांगली वैद्यकिय सेवा मिळावी आणि खाजगी रुग्णालयाच्या मनमानी लूटमारीतुन सुटका मिळावी म्हणुन तत्कालिन जनता दलाचे नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचीका केली होती. न्यायालयाच्या आदेशाने महापालिका आणि सत्ताधारायांना रुग्णालय बांधुन ते सुरु करणे भाग झाले. २०० खाटांचे सदर रुग्णालय असले तरी पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थे मुळे आजही शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभाग, आवश्यक डॉक्टर व यंत्रणाच उपलब्ध झाली नाही. यातुनच रुग्ण दगावण्याचे तसेच रेल्वेत बाळंत होण्याचे प्रकार घडले. या शिवाय विविध प्रकरणांनी सदर रुगणालय नेहमीच वादग्रस्त राहिले.
रुग्णालय सक्षमपणे चालवण्या ऐवजी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ते शासनाच्या माथी मारण्याचा खटाटोप सतत केला. तर शासना कडुन देखील पालिकेने आवश्यक बाबींची पुर्तता केली नाही म्हणुन रुग्णालय घेतले नाही. अखेर तीन महिन्यात पालिका सर्व प्रलंबित कामे करुन देईल या अटीवर केवळ व्यवस्थापन शासनाच्या आरोग्य विभागाने घेतले आहे. तर बाकी सर्व सुविधा, कर्मचारी पुरवणे, देखभाल आदी जबाबदारी पालिकेचीच आहे.
परंतु पालिकेच्या ढिसाळ आणि उदासीन कारभारा मुळे जोशी रुग्णालयाच्या व्यथा काही संपता संपत नाहित. रुग्णालयाच्या स्वच्छतागृहाचे पाईप गळत असल्याने रुग्णालय परिसरात सांडपाणी साचुन आहे. सदर सांडपाण्या मुळे दुर्गंधी पसरली असुन डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यातच रुग्णालयाच्या पिण्याच्या पाण्याची टाकी येथे आहे. सदर टाकीचे झाकण तर नेहमीच अर्धवट उघडे असते. त्याभोवती सांडपाण्याचे तळे साचलेले आहे.
सांडपाण्या मुळे दुर्गंधी व डासांच्या त्रासाने रुग्ण तसेच रुग्णालयातील कर्मचारी, येणारे नागरिक व परिसरातील रहिवाशी देखील ग्रासले आहेत. त्यातच पाण्याची टाकी देखील सांडपाण्याच्या विळख्यात आल्याने रुग्ण आदिंना होणारा पाणी पुरवठा सुध्दा सुरक्षित राहिलेला नाही. गेल्या काही महिन्यां पासुन सांडपाण्याची गळती, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असताना देखील महापालिका प्रशासनाने या कडे डोळेझाक चालवली आहे.
आपापली पालिकेतील दालनं नागरीकांच्या पैशां मधुन आलिशान करुन घेण्यात स्वारस्य असणाराया प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे रुग्णालयातील सांडपाणी आणि स्वच्छता राखण्या कडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा संताप नागरिकांनी बोलुन दाखवला आहे.