पालघर कलेक्टर कचेरीवर पत्रकारांचा मोर्चा
By admin | Published: October 4, 2016 02:10 AM2016-10-04T02:10:22+5:302016-10-04T02:10:22+5:30
राज्यातील पत्रकारावर होत असलेले हल्ले, दाखल होत असलेले खोटे गुन्हे, मुस्कटदाबी, जेष्ठ पत्रकारांचे पेन्शन ई. बाबत निर्णय घेण्यास शासन वीस वर्षांपासून
पालघर : राज्यातील पत्रकारावर होत असलेले हल्ले, दाखल होत असलेले खोटे गुन्हे, मुस्कटदाबी, जेष्ठ पत्रकारांचे पेन्शन ई. बाबत निर्णय घेण्यास शासन वीस वर्षांपासून टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने सोमवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर निर्धार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यातील पत्रकारांच्या सोळा संघटनांनी स्थापन केलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने हुतात्मा स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील, उपाध्यक्ष सुरेश काटे,शाम आटे, नारायण पाटील, हुसेन खान, मच्छीन्द्र आगीवले, अमोल सांबरे, पालघर तालुका मराठी पत्रकार संघ हेमेंद्र पाटील, विजय घरत, विनायक पवार, के.नारायण,मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजीव जोशी, नीरज राऊत,वैभव पालवे, प्रमोद पाटील, यांनी जिल्हाधिकारी बांगर आणि पोलीस अधिक्षिका राऊत यांना निवेदन सादर केले.
आम्ही सत्तेत आल्यावर लगेच पत्रकार संरक्षण कायदा करू आणि जेष्ठ पत्रकारांना पेन्शन देऊ असे आश्वासन भाजपने नागपूर येथे पत्रकार हल्ला विरोधी समितीने काढलेल्या मोर्च्या दरम्यान दिले होते. सत्ता बदला नंतर भाजपा सरकार दोन वर्षापासून सत्तेत आल्यानंतर प्रतीक्षा करूनही पत्रकारांना न्याय मिळालेला नाही. सरकार कायदा करण्यास टाळाटाळ करीत असल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना चिंता वाटावी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच आता पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा नवीन ट्रेंड महाराष्ट्रात सुरु झाला आहे. माध्यमांचा आवाज बंद करण्याचा हा प्रकार लोकशाहीसाठी मारक आणि समाजस्वास्थ्य बिघडविणारा आहे. म्हणून सरकारने कायद्याचा जो मसुदा तयार केला आहे त्यानुसार वटहुकूम काढावा आणि राज्यात तातडीने पत्रकारांना कायदेशीर संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
(वार्ताहर)