जंगल सफारी, वर्षा सहलींच्या आनंदावर विरजण; यंदा पावसाळी पर्यटनावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 02:55 AM2020-07-03T02:55:52+5:302020-07-03T02:56:04+5:30

नियमांचे उल्लंघन झाल्यास होणार कडक कारवाई

Jungle safaris, immersion in the joy of rain trips; Rain tourism banned this year | जंगल सफारी, वर्षा सहलींच्या आनंदावर विरजण; यंदा पावसाळी पर्यटनावर बंदी

जंगल सफारी, वर्षा सहलींच्या आनंदावर विरजण; यंदा पावसाळी पर्यटनावर बंदी

Next

पारोळ : वसईतील निसर्गरम्य परिसर आणि पावसाळा म्हटला की, पर्यटकांना वन-डे पिकनिकसाठी चांगली मेजवानीच असते. दरवर्षी जंगल सफारी आणि वर्षा सहलीचा आनंद लुटत वसईतील सागरी किनारे तसेच तुंगारेश्वर अभयारण्यातील पावसाळा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आसुसलेले असतात. यंदा मात्र पर्यटकांच्या या उत्साहावर कोरोनाचे सावट असल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

पावसाळी पर्यटनावर जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने निर्बंध लादत २७ आॅगस्टपर्यंत वसईत पर्यटकांना पावसाळी पर्यटनासाठी येता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. आदेशाची पायमल्ली करून पर्यटनासाठी पर्यटक दाखल झाल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.
ऐतिहासिक वसईला निसर्ग, सागरी, विविध लोकजीवन आणि इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला आहे. पावसाळ्यात येथील निसर्गाने अंगावर ओढलेला हिरवागार शालू मन वेधून घेतो. मन प्रसन्न व आल्हाददायक करणारे वातावरण पावसाळ्यात चोहोबाजूने पाहावयास मिळत असल्याने ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या ठिकाणाहून पर्यटक मोठ्या संख्येने वसईत दाखल होतात. पावसाळ्यात पाऊस आणि सोबत मित्र कंपनी असली की, पाण्यात डुबक्या मारायला, बागडायला मज्जाच मज्जा येत असल्याने वसईतील पावसाळी पर्यटन स्थळे पर्यटकांच्या पसंतीची पहिली केंद्रे ठरली आहेत.

तुंगारेश्वर अभयारण्यातील जंगल सफारी तसेच येथील धबधबा आणि चिंचोटी परिसरातील मोठा धबधबा या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. स्थानिकांनादेखील या पर्यटनामुळे चांगला रोजगार मिळतो. वसईतील सागरी किनारेदेखील पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांना वेधून घेत असल्याने विकेण्डला पर्यटकांची या ठिकाणी तोबा गर्दी पाहायला मिळते. मनाला विसावा देणारी ही पर्यटन स्थळे यंदा कोरोना महामारीमुळे ओस पडली आहेत. सध्या शासनाने टाळेबंदीचे नियम शिथिल केले असले तरी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना २७ आॅगस्टपर्यंत बंदी असणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि वन विभागाने दिले आहेत. वसईतील पावसाळी पर्यटन दरवर्षी धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे यंदा कोरोनाचा धोका आणि पर्यटन स्थळाभोवती असलेला धोका पाहता ही पर्यटन स्थळेच पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी जिल्हा व वन विभागाने ही खबरदारी घेतली आहे. तुंगारेश्वर अभयारण्याच्या हद्दीत पावसाळी पर्यटनावर वन विभागाचे बारीक लक्ष असणार आहे. नियम डावलून कोणी त्या ठिकाणी गेल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

पावसाळी पर्यटनामुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळतो. यंदा ही पर्यटनस्थळेच बंद करण्यात आल्याने स्थानिकांचा रोजगार बुडणार आहे. आधीच रानातील रानमेवा, रानभाज्या कोरोनामुळे विकल्या जात नसल्याने स्थानिक गोरगरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यात पावसाळी पर्यटन बंद राहिल्याने स्थानिकांचे प्रचंड हाल होणार आहेत. यंदा पावसाळी पर्यटनावर कोरोनाचे संकट असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

Web Title: Jungle safaris, immersion in the joy of rain trips; Rain tourism banned this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन