वैभवने घेतले होते कराटेचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:15 AM2018-08-13T03:15:40+5:302018-08-13T03:15:54+5:30
आठ गावठी बॉम्ब आणि स्फोटकांच्या प्रचंड साठ्यासह पकडण्यात आलेला वैभव राऊत कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी कराटे, भालाबाजी याचे प्रशिक्षणही घेतले असल्याची माहिती सूत्राकडून समोर आली आहे.
पारोळ : आठ गावठी बॉम्ब आणि स्फोटकांच्या प्रचंड साठ्यासह पकडण्यात आलेला वैभव राऊत कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी कराटे, भालाबाजी याचे प्रशिक्षणही घेतले असल्याची माहिती सूत्राकडून समोर आली आहे
वैभव राऊत (४०) हा मूळचा नालासोपारा पश्चिमेतील भंडार आळी येथे राहणारा आहे. त्याला १ मुलगा आणि १ मुलगी आहे. त्याचा इस्टेट एजंटचा व्यवसाय आहे. वैभवचे शिक्षण बारावीपर्यंत पूर्ण झालेले असून महाविद्यालयीन शिक्षण त्याने अर्धवट सोडले असल्याचे समजते .
गेल्या सहा वर्षांपासून तो सनातन संस्थेच्या विचारधारेशी जोडला गेला असल्याची माहिती मिळते. तसेच त्याने गोरक्षा ही सामाजिक चळवळ सक्रीयपणे चालवली आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या या तरुणाच्या अटकेचे पडसाद नालासोपाऱ्यात उमटले आहेत.
पालघर जिल्ह्यात प्रथमच एटीएसने कारवाई करून सनातन संस्थेच्या एका साधकाला ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. हा साधक कथितरित्या बॉम्ब तयार करीत होता. त्याच्याकडे मिळालेल्या गावठी बॉम्ब व ते बनविण्याच्या सामग्रीमुळे आता एटीएसचे लक्ष पालघर जिल्ह्याकडे लागून राहिले आहे. यातून अनेक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आ़हे.
स्थानिक पोलिसांना एटीएसने ठेवले अंधारात
ऐन बकरी ईद च्या दिवशी घातपात करण्याचा त्यांचा कट असावा असा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. नालासोपारयातील वैभव राऊतच्या घरी गुरु वारी रात्री एटीएसने अतिशय गोपनीयतेने धाड टाकली होती. याबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. एवढा भयानक कारभार होत असून त्याची गंधवार्ताही ना पोलिसांना होती ना स्थानिकांना होती, हे कसे? घडले. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.