काेराेनाची नियमावली धाब्यावर, पापडी आठवडाबाजारात गर्दी; साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 11:58 PM2020-12-04T23:58:15+5:302020-12-04T23:58:27+5:30
वसई-विरार महापालिकेने वसईतील दुकाने आणि बाजार भरविण्यास परवानगी दिली होती. मात्र, नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे.
विरार : लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर सर्वत्र पुन्हा नेहमीची चहलपहल सुरू झाली आहे. सरकारने लाॅकडाऊन हटविताना मास्क, साेशल डिस्टन्सिंग याबाबत नियमावली घालून दिली आहे. मात्र, वसईतील पापडी येथे शुक्रवारी भरणाऱ्या आठवडाबाजारात ही नियमावलीच धाब्यावर बसवली जात आहे. या बाजारात येणारे नागरिक साेशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे याकडे कानाडाेळा करीत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यावर पालिकेने वेळीच लक्ष देऊन नियंत्रण आणून दुसऱ्या लाटेचा धाेका टाळावा, अशी मागणी हाेत आहे.
वसई-विरार महापालिकेने वसईतील दुकाने आणि बाजार भरविण्यास परवानगी दिली होती. मात्र, नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे. यासाठी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून १०० रुपये दंडही आकारण्यात येत होता. मात्र, वसई-विरारमधील बाजार आणि बाजारातील उत्स्फूर्त गर्दी पाहता या गर्दीवर नियंत्रण करणे महापालिकेच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसत आहे. या बाजारात येणारे ग्राहक सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. परिणामी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वसई-पापडी येथील आठवडा बाजारातही शनिवारी उत्स्फूर्त गर्दी उसळल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पालिकेने तातडीने याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, वसई-विरार शहरात गुरुवारी ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यात २८ पुरुष व २५ महिलांचा समावेश आहे.
सरकारच्या आरोग्य खात्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहरातील आठवडा बाजार आणि अन्य बाजारांत होणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. सुरक्षेच्या कोणत्याही नियमांची येथे अंमलबजावणी होत नाही. किमान पालिकेने या ठिकाणी कर्मचारी नेमून सुरक्षा नियमांची काळजी घ्यावी. - तस्नीफ नूर शेख, वसई-विरार शहर अल्पसंख्याक उपाध्यक्ष, भाजप