मुरबाड विधानसभेत कथोरेंनी तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:37 PM2019-05-24T23:37:45+5:302019-05-24T23:37:49+5:30
युतीचा धर्म पाळला गेल्याने मतांची टक्केवारीही वाढलेली
खासदार कपिल पाटील यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा हा मुरबाड विधानसभा मतदारसंघाने उचलला आहे. पाटील यांच्याविरोधात मतदारसंघात नाराजी असतानाही ही नाराजी दूर सारण्यात आमदार किसन कथोरे यांना यश आले आहे. त्यातच, मुरबाडमध्ये युतीचा धर्म पाळला गेल्याने मतांची टक्केवारीही वाढलेली आहे. ६४ हजारांच्या मतांची आघाडी ही निर्णायक ठरली.
पाटील यांच्याविरोधात मुरबाड आणि बदलापूरमध्ये नाराजी होती. शिवसैनिक नाराज असतानाही या मतदारसंघात पाटील यांना चांगले मताधिक्य मिळवण्यात यश आले आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची धुरा ही आमदार कथोरे यांच्यावर होती. पाटील यांनी जास्तीतजास्त वेळ हा मुरबाड मतदारसंघातच दिला. त्याचा फायदा त्यांना झाला आहे. मुरबाड मतदारसंघात बदलापूरचे शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनीही पाटील यांच्यासोबत जमवून घेतल्याने त्याचा फायदा झाला. बदलापूरमधील ग्रामीण भाग आणि शहरी भागातही शिवसेनेच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कामे केल्याने पाटील यांचा विजय निश्चित झाला.
मुरबाड मतदारसंघात शिवसेनेची ताकद ही कमी असली, तरी भाजपसोबत काम करण्यात त्यांनीही कमीपणा घेतला नाही. काही भागात नाराज शिवसैनिक हे तटस्थ राहिल्याने त्याचा परिणाम होईल, असे वाटत होते. मात्र, प्रत्येक ठिकाणी पाटील यांना टावरे यांच्या तुलनेत दुप्पट मते मिळत होती.
कथोरेंसाठी विधानसभा सोपी
गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार किसन कथोरे हे २५ हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून आले होते. त्यातच गेल्या पाच वर्षांत झालेल्या कामांच्या जोरावर आगामी निवडणूकही त्यांना सोपी आहे. त्यातच युती करून निवडणूक लढवल्यास कथोरे यांचे मताधिक्य हे वाढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तर, युती न करता लढल्यास कथोरे यांना पूर्वीच्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य घेण्यासाठी पुन्हा एकदा कौशल्य दाखवण्याची वेळ येणार आहे. तर, राष्ट्रवादीला या मतदारसंघात हवा तसा प्रतिसाद लाभत नाही, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
की फॅक्टर काय ठरला ?
गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात शिवसेनेसोबत वैर केलेले असतानाही कपिल पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसैनिकांना काम करण्यास भाग पाडले.
मुरबाड मतदारसंघात शेवटच्या वर्षात कामे मंजूर करून मतदारसंघातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्या पथ्यावर पडला. त्यातच मुख्यमंत्री यांनीही मतदारसंघातील कामांचे श्रेय दिले.
पाटील यांनी आमदार कथोरे यांच्यासोबत जमवून घेतल्याने त्याचा फायदा त्यांना झाला आहे. कथोरे यांनीही पूर्ण ताकदीने काम केले. त्यातच मनसे फॅक्टरचा प्रभाव न पडल्याने त्याचाही लाभ झाला.