‘कवी’ने वाढला समुद्रात संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:26 PM2019-01-13T23:26:19+5:302019-01-13T23:26:34+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा : वसई, उत्तन, अर्नाळा विरुद्ध पालघर, डहाणू
- हितेन नाईक
पालघर : समुद्रातील मासेमारी क्षेत्राबाबत नियमावली बनविण्यात शासनाने दाखविलेल्या उदासीनतेचा फायदा उचलीत दुसरीकडे मच्छीमारांच्या लवादाचे निर्णय पायदळी तुडवीत वसई, उत्तन, अर्नाळा, मढ आदी भागातील काही मच्छीमारांनी समुद्रात थेट दिव-दमणपर्यंत कवीचे क्षेत्र विस्तारत नेले आहे. त्यामुळे पालघर-डहाणू भागातील मच्छीमाराचे मत्स्यउत्पादन कमालीचे घसरले. रोजीरोटीच्या प्रश्नासह डोक्यावर वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलेल्या दमण ते दातीवरे मधील मच्छीमार एकजूट झाला असून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आर या पार च्या लढाईची घोषणा देत धडक द्यायला सज्ज झाला आहे.
जिल्हा संरक्षण समितीने ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याकडे केलेल्या तक्र ारीची दखल घेत त्यांनी दोन्ही कडच्या मच्छीमारांची बैठक घेतली. त्यात पालघर, डहाणूतील मच्छीमारी व्यवसायावर अतिरिक्त कविमुळे विपरीत परिणाम होत असल्याने वसई-उत्तन मधील मच्छीमारांनी सातपाटी गावासमोरील ४२.५ सागरी मैलाच्या (नॉटिकल) पुढे ३२० डिग्री क्षेत्रातील सर्व कवी काढून टाकण्याचे आदेश दिले. त्या आदेशाच्या विरोधात २००४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वसईसह अन्य मच्छीमारांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला या संदर्भातील कायदे बनविण्याचे आदेश दिले. त्यानंतर १५ वर्षात अनेक राजकीय पक्षांची सरकारे आली परंतु हा प्रश्न सुटावा असे कुणालाही मनापासून वाटले नाही.
सन १९८० च्या दरम्यान वसई तालुक्यातील काही मच्छीमारांनी दातीवरे, वडराई, सातपाटी गावाच्या समोरील समुद्रात खुंट रोवून अतिक्र मण केल्याने मोठा संघर्ष निर्माण झाला होता. त्यावर १९८२ मध्ये तालुक्यातील २८ गावांची समिती (लवाद) नियुक्त करून वसई, अर्नाळा भागातील मच्छीमारांनी एडवण ते वडराई गावाच्या मासेमारी क्षेत्र सोडून त्यांच्या बाहेरील क्षेत्रात कवी मारण्याची मुभा दिली होती. वरील गावे भविष्यात व्यवसायात प्रगतिशील झाल्यानंतर वसईच्या मच्छीमारांनी आपल्या कवी काढून घ्याव्यात असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.
लवादाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्येक भागातील मच्छीमार करीत आले असताना वसई तालुक्यातील मच्छीमारासह उत्तन, मढ आदी भागातील हजारो मच्छिमारांनी मात्र आपल्या कवींचे क्षेत्र थेट दिव-दमण, जाफराबाद पर्यंत विस्तारित नेले आहे. रूढी, रीती-रिवाज, लवाद याला कायदेशीर चौकट (शासन मान्यता) नसल्याने आणि समुद्रात कायदे बनविण्याच्या अनेक वर्षाच्या मागणीकडे राज्य व केंद्र शासनाने दुर्लक्ष केल्याने आपण समुद्रात कुठेही, कशाही पद्धतीचा अवलंब करून मासेमारी करू शकतो. या भावनेने १९८० पासून हळूहळू शेकडो कवींच्या संख्येने सुरू झालेली घुसखोरी आज हजारो कवींच्या संख्येत परिविर्तत झाले असल्याची टीका धंदा संरक्षण समितीचे उपाध्यक्ष सुभाष तामोरे यांनी केली आहे. या संदर्भात उत्तन येथील मिच्छमार नेते तसेच महाराष्ट्र मिच्छमार कृती समतिीचे अध्यक्ष लिओ कोलॅसो ह्यांच्याशी प्रतिक्रि ये साठी अनेक वेळा मोबाईल वर संपर्क करूनही त्यांनी फोन उचलला नाही.
कव म्हणजे काय?
समुद्रात बोंबील अथवा पापलेट माश्याच्या मासेमारी साठी दोन लाकडी अथवा लोखंडी खांब (अंदाजे २० फूट ते ६० फूट) समुद्रातील तळ जमिनीच्या आत गाडले जातात. त्या दोन खांबांना डोल नेट पद्धतीचे जाळे लावले जाते.ह्या खांबांना ३० ते ४० फूट लांबीच्या जाडजूड दोरखंडाला तरंगते फ्लोट्स लावले जातात.अश्या एका बोटींच्या मालकीच्या ३० ते ४० कवी समुद्रात मारलेल्या असतात.