वाढवण बंदराविरोधात केरळमध्ये आक्रोश; मच्छिमार महिलांची रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 02:07 AM2019-12-09T02:07:21+5:302019-12-09T06:20:40+5:30
किनारपट्टीवरील रस्ते, घराच्या भिंतींवर एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द अशा घोषणा रंगवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती.
पालघर : केरळ येथील एनार्कुलममध्ये झालेल्या नॅशनल फिश वर्कर्स फोरम आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमादरम्यान निघालेल्या रॅलीमध्ये मच्छिमार महिलांनी रस्त्यावर उतरून ‘वाढवण बंदरा’विरोधातील आपला आक्रोश व्यक्त केला. या वेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये ‘वाढवण बंदर हटाव’चे बॅनर हातात घेऊन ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’चा जोरदार नारा दिला.
१९९६-९८ दरम्यान जिल्ह्यातील डहाणूकरांच्या मानगुटीवर बसलेले वाढवणचे भूत डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे अध्यक्ष चंद्रशेखर धर्माधिकारी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विरोध आणि स्थानिकांच्या एकजुटीने यशस्वीपणे परतावून लावले होते. या बंदरविरोधात एवढा मोठा जनक्षोभ उसळलेला असताना व प्राधिकरणाच्या सुनावणीत पाच निर्णय पारित झाले असताना पुन्हा या बंदराने आपले डोके वर काढले असून भाजपा सरकारने ५ जून २०१५ रोजी एक सामंजस्य करारही केला आहे.
या बंदर उभारणीची घोषणा सरकारने करताना पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची कुठलीही परवानगी न घेता आपल्या एकाधिकारशाहीच्या जोरावर हे बंदर पुन्हा लादले जात असल्याचे बंदरविरोधी संघर्ष समितीचे म्हणणे आहे. या बंदर उभारणीला झाई-बोर्डी ते थेट मुंबई दरम्यानच्या स्थानिक मच्छिमार, शेतकरी, डायमेकर आदींचा प्रखर विरोध असतानाही हे सरकार बंदर लादू पाहात असल्याने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरही अनेक गावे, मतदारांनी बहिष्कार टाकीत आपला रोष व्यक्त केला होता.
किनारपट्टीवरील रस्ते, घराच्या भिंतींवर एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द अशा घोषणा रंगवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. या वेळी टाऊन हॉल येथे झालेल्या सभेत कोचीचे खासदार हिबी येडन, केंद्रीय राज्य मंत्री जे.के. थॉमस, एनएफएफ अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृती समिती अध्यक्ष लिओ कोलासो, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष मोरेश्वर पाटील, फिलीप मस्तान, राजन मेहेर, सचिव मोरेश्वर वैती, रविकिरण तोरसकर, दिलीप घारे इत्यादींसह महाराष्ट्रामधून शेकडो मच्छिमार उपस्थित होते. या परिषदेत वाढवण बंदराविरोधात तीव्र विरोध पाहायला मिळाला.
एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द
पालघर व मुंबई जिल्ह्यात सुरू असलेली वाढवण बंदराविरोधातील धगधगती आग आता राज्याबाहेर पसरू लागली आहे. ७, ८, ९ डिसेंबर दरम्यान नॅशनल फिश वर्कर्स फोरम या देशातील मच्छिमारांच्या संघटनेची कॉन्फरन्स केरळमधील एनार्कुलम येथे आयोजित करण्यात आली आहे. या संघटनेची रॅली मरीन ड्राईव्ह ते टाऊन हॉलदरम्यान काढण्यात आली.
या रॅलीमध्ये पालघर, मुंबईमधील महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या रणरागिणी पूर्णिमा मेहेर, उज्वला पाटील, ज्योती मेहेर, अनिता धनूर, संगीता वैती, सुमती मेहेर, अनुसया पाटील आदींनी ‘वाढवण बंदर हटाव’चे बॅनर हातात घेऊन ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’चा जोरदार नारा दिला. स्थानिक मच्छिमार महिलाही या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.