मुख्यमंत्री ग्रामसडकला पडले खड्डेच खड्डे
By admin | Published: April 1, 2017 05:18 AM2017-04-01T05:18:41+5:302017-04-01T05:18:41+5:30
मासवण ते नागझरी या बोईसरला जोडणाऱ््या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याला आताच भगदाडे पडायला सुरुवात
हितेन नाईक / पालघर
मासवण ते नागझरी या बोईसरला जोडणाऱ््या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याला आताच भगदाडे पडायला सुरुवात झाली आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यातच तो वाहून जाण्याची चिन्हे असल्याने स्थानिकासोबत सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरेनी त्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दर्जोन्नतीसाठी मासवण ते नागझरी राज्यमार्ग क्रमांक ३४ असा ० किमी ते ९/८५३ किमी लांंबीचा रस्ता २१ आॅक्टोबर पासून सुरु होणे अपेक्षित असतांना अलीकडेच तो सुरु झाला. ठेकेदार या रस्त्याचे काम निकृष्ट करीत असल्याचे येथील नागरिकानी निदर्शनास आणून दिले आहे.
सुमारे ५ कोटी ५ लाख ८५ हजार किमतीच्या या रस्त्यावर ९.७०३ किमी डांबरीकरण होणार आहे तसेच पाणी जाण्यासाठी एकूण १२ मोऱ्या समाविष्ट आहेत. यामध्ये १ किमीचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम खाते बांधणार असून यातील काँक्र ीटचा काही भाग जिल्हा परिषद बांधणार आहे.या रस्त्यांची उंचीही वाढवण्यात आली असली तरी मोऱ्या अरुंद असल्याने पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी साचून शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता ज्ञाती हितवर्धक संघाचे माजी अध्यक्ष एम पी पाटील यांनी वर्तविली आहे. पूर्वी मासवणहून नागझरीमार्गे बोईसर व तिथून पुढे जाण्यासाठी येथील वांदिवाली, वाकडी, वसरोली, खरशेत, काटाले, लोवरे, निहे, नागझरी ई. भागातील ५ हजार रहिवाशांसाठी हा एकमेव मार्ग होता. मात्र या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात चोरटी रेती, डबर,विटांची वाहतूक होत असल्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली, त्यामुळे एसटी, रिक्षासेवा बंद पडल्याने एक वर्षा पूर्वी जनतेच्या उद्रेकानंतर प्रशासनाने हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत दर्जोन्नती म्हणून मंजूर केला.आता या रस्त्याचे काम सुरु झाले आहे. या रस्त्यामुळे आपली सोय होईल.या विश्वासाला रस्त्यांच्या निकृष्ट बांधणीमुळे तडा गेला आहे. एकीकडे हे काम आम्ही व्यविस्थत व दर्जेदार करू असे ठेकेदार आर. के. सावंत यांनी नेमणूक केलेली माणसे आणि कार्यकारी अभियंता आर. एल. दुधे सांगत असतांना दुसरीकडे रस्त्यावरील भलामोठा डांबरचा कोट व खडी आताच उखडली गेली आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणा ठेकेदारांशी हातमिळवणी करीत आहेत. त्यामुळे आम्ही वेळोवेळी घटनास्थळी जाऊन दर्जाची तपासणी करतो व ठेकेदाराने निकषांप्रमाणे दर्जा कायम राखला आहे, हा बांधकाम खात्याचा दावा फोल ठरला आहे.
अधिकारी घालतात ठेकेदाराला पाठीशी
या फुटलेल्या रस्त्याची बांधणी कंत्राटदारामार्फत पुन्हा करवून घेऊ असे उत्तर कार्यकारी अभियंत्यांनी लोकमतला दिले असले तरी काही दिवसातच रस्त्याची अशी अवस्था होत असल्यास पूर्ण रस्त्याची
गुणवत्ता कशी असणार? याचा अंदाज आम्हाला आताच आल्याचे राहुल घरत, प्रताप पाटील इ. ग्रामस्थांनी सांगितले. रस्ता फुटलेला आहे हे दिसत
असताना ठेकेदाराला वाचवण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न शासकीय यंत्रणा करीत असल्याचे दिसून येते.
या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत आमसभेत पडसाद उमटले होते तर काटाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने या कामा विरोधात ठराव केला असून लवकरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्यांच्या कडे तक्र ार केली जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष महेंद्र अधिकारी यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींनी या सर्व ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडल्याने आपण त्यांच्या साथीने मोठे आंदोलन उभारणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सांबरे यांनी लोकमतला दिली.