खानिवडे गावच्या खाडीमध्ये सापडला तब्बल 22 किलो वजनाचा "खाजरी" मासा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 09:25 PM2020-05-02T21:25:26+5:302020-05-02T21:25:35+5:30
चक्क 22 किलो वजनाचा "खाजरी" नावाचा भला मोठा मासा गळाला लागल्याने त्यांचे नशीब या लॉकडाऊनच्या टाळेबंदीत देखील चमकले आहे.
आशिष राणे
वसई : सर्वत्र कोरोनाचे संकट व त्यात लॉकडाऊन सुरु असल्याने मागील दीड महिन्यापासून कुणालाही काहीही कामकाज नाही त्यात आपला व कुटुंबाचा घरखर्च कसा चालवायचा या विचाराने या मच्छीमार तरुणाने आपल्या वसई पूर्वेच्या ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसायाला पुन्हा एकदा हात घालीत खानिवडे खाडीत मासेमारी करून "खाजरी" नावाच्या चविष्ट भल्या मोठ्या माश्यालाच आपल्या जाळ्यात अडकवले आहे.
वसई तालुक्यातील पूर्व भागात मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे गावाच्या तानसा खाडीत मासेमारी करणाऱ्या विकास किणीना अलीकडेच त्यांनी लावलेल्या जाळ्यात चक्क 22 किलो वजनाचा "खाजरी" नावाचा भला मोठा मासा गळाला लागल्याने त्यांचे नशीब या लॉकडाऊनच्या टाळेबंदीत देखील चमकले आहे.
विशेष म्हणजे विकास किणी यांना मिळालेला खाजरी नावाचा हा मासा हा काट्यांचा नसून खायला अत्यंत चविष्ठ असल्याने त्याला खाडीबाहेर काढल्यावर लगेचच मागणी आली आणि याप्रसंगी अनेक खवय्यांनी मिळून तब्बल दहा हजार पाचशे रुपयांनी या माश्याची खरेदी झाली.
दरम्यान येथील खाडीतील मासेमारी पकडण्याचे नियोजन अत्यंत उत्तम असल्याचे खानिवडे ग्रामस्थ विश्वनाथ कुडू सांगतात,कि या खाडीत दररोज येणाऱ्या भरती व ओहोटीच्या प्रवाहात गळ टाकून, झोलणे झोलुन, पांग फेकून, वेढी लावून, प्रवाहाच्या धारेत वाघरु ठेवून व अंधारात हाताने चाफून हि नियोजनबद्ध मासेमारी केली जाते.
आणि असे हे विशेष मासेमारीचे चित्र महामार्गावरून नेहमीच येता- जाता मुंबई किंवा गुजरातकडे जाणाऱ्या सर्वांच्याच दृष्टिक्षेपात दिसत असते.
परंतु सध्या टाळेबंदी असल्याने महामार्गावर शुकशुकाट व त्यासोबत प्रदूषण देखील फारच कमी आहे.
महामार्गावर अगदी तुरळक व अत्यावश्यक वाहनेच धावत आहेत आणि त्यामुळे खाडीचे पाणी देखील स्वच्छ व संथ झाले आहे..
अगदी छोट्या -छोट्या माश्यांच्या मासेमारीत अगदी केव्हा तरी आतापर्यंत केवळ 10 किलोच्या आसपास असा एखादा मासा आढळला असल्याचा इतिहास आहे.आणि आता तर लॉकडाऊन मध्येच हा भला मोठा मासा भरतीवर लावलेल्या जाळ्यात ओहोटीच्या वेळी गावला आणि गावच्या मच्छीमार तरुणाचे नशीब या कोरोनच्या संकटात देखील टाळेबंदीत दिलासा देणारे ठरले याला योगायोगच म्हणावं लागेल.