अज्ञात तापाने खुपरी गाव फणफणला; आरोग्य विभागाची धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 10:58 PM2019-06-02T22:58:15+5:302019-06-02T22:58:31+5:30
वाडा तालुक्यातील खुपरी हे १२०० ते १५०० लोकवस्ती असलेले गाव आहे.
वाडा : वाडा तालुक्यातील खुपरी गाव तापाने फणफणला असून ५० हून अधिक जणांना तापाची लागण झाली असून त्यांच्यावर शासकीय व विविध खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तापाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. तापाच्या साथीने मात्र गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.काही जणांमध्ये डेंग्यूची लक्षणे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. विनोद पाटील (वय ३८) भूषण नाईक, मालती नाईक , सार्थक भोईर, निवेदिता भोईर, गणपत भोईर , रविंद्र नाईक, निर्मला भोईर, किरण ताठे, पांडुरंग चौधरी, चंदन जहां, सपना नाईक, या रूग्णांवर वाडा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरीत रूग्णांवर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाडा तालुक्यातील खुपरी हे १२०० ते १५०० लोकवस्ती असलेले गाव आहे. या गावातील चौधरी पाड्यातील अनेकांना तापाची लागण झाली आहे. यामध्ये प्रथमत: नागरिकांना अंग दुखणे, स्नायु दुखणे नंतर ताप येतो अशी लक्षणे आढळलीत आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात कार्यरत असून काही रूग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी डहाणू येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. गावात पाण्याची टाकी असून तिची गेल्या अनेक वर्षापासून साफसफाई केली नव्हती. तसेच गावातील गटारांची स्वच्छता केली जात नसल्याने डासांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे ही साथ उद्भभवली असावी असा अंदाज आहे.
वाडा ग्रामीण रूग्णालयात खुपरी येथील तापाच्या रूग्णांवर उपचार सुरू असून यातील दोन ते तीन रूग्णांमध्ये डेंग्यू ची लक्षणे जाणवत आहेत.सर्व रूग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक आहे. -डॉ. प्रदीप जाधव , वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रूग्णालय वाडा